देवदर्शनावरून परतताना डंपरची दुचाकीला धडक; पती-पत्नी ठार
कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):- इचलकरंजी येथील पंचगंगा नदी रस्त्यावरील यशोदा पूलानजीक सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात पती-पत्नी ठार झाले. देवदर्शनावरून परतत असताना डंपरने दुचाकीला धडक दिली. या दुर्घटनेत पत्नी सुनीता संजय वडिंगे (वय ५५) या जागीच ठार झाल्या, तर पती संजय सदाशिव वडिंगे (वय ५८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संजय वडिंगे हे होमगार्ड विभागाचे इचलकरंजी प्रभारी अधिकारी होते आणि एका महिन्यापूर्वीच सेवानिवृत्त झाले होते. ते दररोज सकाळी पंचगंगा नदीकिनारी असलेल्या वरदविनायक मंदिरात दर्शनासाठी जात असत. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी देवदर्शन करून परतत असताना हा अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेतली आणि आक्रोश केला.
अपघातामुळे यशोदा पूलाजवळ वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला.
या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातातील डंपर गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.