आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त 3 डिसेंबर रोजी रॅलीचे आयोजन
कोल्हापूर, दि.2 (जिमाका) : दर वर्षी 3 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 1 ते 8 डिसेंबर या सप्ताहामध्ये दिव्यांगांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दिव्यागांच्या जनजागृतीसाठी मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता रॅली आयोजित करण्यात आली असून रॅलीचे उदघाटन जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी दिली आहे.
रॅलीची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांना अभिवादन करुन बिंदू चौकातून होणार आहे. रॅलीत दिव्यांग शाळेतील सुमारे 300 विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार आहेत. रॅलीचा मार्ग बिंदू चौक, कोषागार कार्यालय ते दसरा चौक असा असणार आहे. दिव्यांग दिना निमित्त दिव्यांग बालकांना समावेशित शिक्षण व दिव्यांगांचे त्वरित निदान व उपचार याबाबत मार्गदर्शन, दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 चे वाचन कार्यक्रम, दिव्यांगांच्या कला गुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने दिव्यांगांच्या विविध स्पर्धा (रांगोळी, भरतकाम, चित्रकला, निबंध, वक्तृत्व) यासारख्या स्पर्धांचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन दिव्यांग दिन साजरा केला जातो, असे श्री. पोवार यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.