इचलकरंजी भुयारी गटार योजनेला मंत्रालयात राज्यस्तरीय तांत्रिक मंजुरी – आमदार प्रकाश आवाडे
कुंभोज,प्रतिनिधी (विनोदशिंगे):- आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून इचलकरंजी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ४८८ कोटीच्या भुयारी गटार योजनेला मंगळवारी मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यस्तरीय तांत्रिक समिती (एसआयटीसी) कडून मंजूरी मिळाली आहे. या निर्णयामुळे इचलकरंजीसह वाढीव भागातील समस्या कायमस्वरुपी दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इचलकरंजी शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु हे काम न्यायप्रविष्ठ झालेने ते बंद पडले होते. इचलकरंजी शहराला भुयारी गटार योजनेची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे. भुयारी गटार योजनेचा मूळ प्रस्ताव हा २५५ कोटी रुपयांचा होता. त्यामध्ये असलेल्या काही त्रुटी दूर करुन या योजनेत इचलकरंजी महापालिका हद्दीत समाविष्ट वाढीव भागातही ही योजना राबविण्यात यावी यासाठी आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.राहुल आवाडे हे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रयत्नशील होते. त्या पाठपुुराव्याला यश मिळून या संदर्भात मुंबई येथे मंत्रालयात बैठक आयोजित केली होती या बैठकीस आमदार प्रकाश आवाडे उपस्थित होते.
आमदार आवाडे यांनी, पंचगंगा नदी प्रदुषणाचे अनुषंगाने इचलकरंजी शहरातील अस्तित्वातील भुयारी गटार योजनेचे बळकटीकरण व शहराच्या वाढीव भागात भुयारी गटार योजना राबविणे गरजेचे असल्याचे सांगत २९ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे इचलकरंजी महापालिकेने नव्याने प्रस्तावित केलेल्या प्रस्तावास प्रकल्प खर्चाचा १०० टक्के म्हणजेच ४८८.२२ कोटी रुपये इतका निधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत मंजूर करावा, अशी मागणी केली. यावर झालेल्या चर्चेत राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मंजूरी दिली आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळापासून रखडलेली भुयारी गटार योजना मार्गी लागणार आहे. त्यातून प्रदुषणाचा प्रश्नही सुटणार आहे.
या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शालेय व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.