आयुष्य फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार

    आयुष्य फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार

     

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- ध्येय निश्‍चित करुन जिद्द आणि चिकाटीच्या बळावर ते गाठण्याचा प्रयत्न करा, यश तुमचेच असेल. आयुष्य फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविला जात असलेला उपक्रम कौतुकास्पद असून सर्वच सामाजिक संस्था, संघटनांना अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे, असे आवाहन स्टेट बँकेचे शाखाधिकारी मनोज बुचडे यांनी केले.

    येथील आयुष्य फौंडेशन आणि तौफिक मुजावर युवाशक्ती यांच्या वतीने शहर व परिसरातील इयत्ता दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. बुचडे बोलत होते.

    अध्यक्षस्थानावरुन बोलताना माजी पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी, आजचे युग हे स्पर्धेचे असून पालकांनी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये. मार्क कमी पडण्यासह दुसर्‍या विद्यार्थ्यांशी तुलना न करता अधिकाधिक यश मिळविण्यासाठी प्रोत्साहित करावे. आणि विद्यार्थ्यांनी वस्त्रनगरी इचलकरंजीचा शिक्षणनगरी म्हणून नांवलौकिक होण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन केले. यावेळी पालकांच्या वतीने शरीफा आलासे व प्रकाश रावळ यांनी मनोगत व्यक्त केले.

    स्वागत करुन प्रास्ताविकात फौंडेशनचे अध्यक्ष तौफिक मुजावर यांनी फौंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला. भविष्यकाळात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून त्यांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी फौंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर ही शाबासकीची थाप देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. याप्रसंगी मन्सुर मुजावर, सौ. बिलकिस मुजावर, फरहान मुजावर, श्रीनिवास काजवे, अस्लम मुजावर, पिरगोंडा पाटील, रविंद्र शिंदे आदींसह विद्यार्थी-विद्यार्थीनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.