वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुपच्या वर्धापनदिनी विविध उपक्रमांचे आयोजन
पेठ वडगाव : वैश्य ग्लोबल ग्रुपचा प्रथम वर्धापनदिन रविवार दि.१२ जानेवारी २०२५ रोजी आर्य क्रीडा मंडळ, गावदेवी मैदान, ठाणे रेल्वे स्टेशन नजीक आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त वैश्य समाज बांधवांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रमाचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे. समाजाचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास, या भावनेने वैश्य ग्लोबल ग्रुप गेले वर्षभर कार्यरत असून विविध उपक्रम राबवत आहे.
व्यावसायिक प्रदर्शन दालन, महिलांना व्यावसायिक मार्गदर्शन, मिक्सर नेटवर्किंग सत्र, व्यावसायिक मार्गदर्शन व सादरीकरणाची संधी, पर्यटन वाढीसाठी जिल्हास्तरीय माहिती दालन, समाज बांधवांसाठी विविध उपक्रम, समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा, सरकारी योजनांची माहिती आणि बँकांद्वारे अर्थ पुरवठा माहिती अशा विविध उपक्रमाचा समाज बांधवांना लाभ होणार आहे. वैश्य समाज काल,आज आणि उद्या याविषयी देखील मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.
या स्नेह मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. संतोष कामेरकर, दीपक मेजारी, संजय भाट, रुपाली तेलवणे, विष्णु सातवसे, मनोज आंग्रे व चंद्रकांत खाड्ये यांनी केले आहे.