माध्यमिक पतपेढीला 8.87% कोटी नफा !
सर्वच विभागात विक्रमी वाढ
रत्नागिरी , (प्रतिनिधी):- जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीला सन 2024 – 25 या वर्षात तब्बल 8.87 कोटी ढोबळ नफा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत व्यवहाराशी संबंधित सर्वच बाबींमध्ये उच्चांकी वाढ नोंद झाली असल्याचे पतपेढीचे चेअरमन सागर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहिर केले. पतपेढीचे उपाध्यक्ष किशोर नागरगोजे , मानद सचिव श्रीम. आशाराणी गावडे , सर्व संचालक मंडळ , पतपेढीचे सचिव तातेज विचारे , लेखाधिकारी अशोक कांबळी व सर्व कर्मचाऱ्यांच्या काटेकोर नियोजन व अथक परिश्रमामुळे पतपेढीचा प्रगतीचा आलेख गेली दोन वर्षे सातत्याने वाढत असल्याचे चेअरमन पाटील यांनी स्पष्ट केले.
सन 2024 – 25 या आर्थिक वर्षात पतपढीचे 3251 सभासद असून पतपेढीला ढोबळ नफा 8.87 कोटी झाला असून गतवर्षी च्या तुलनेत 80 लाख रु इतकी वाढ झाली आहे. बुढीत कर्ज निधी चे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत मोठ्याप्रमाणात कमी झाले असून एनपीए 0.67% वरून 0. 44% वर आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ठेवींमध्ये 6.82% वाढ झाली असून सन 2024 – 25 मध्ये एकूण ठेवी 259.23 कोटी झाल्या आहेत. कर्ज वितरणामध्ये देखील गतवर्षीच्या तुलनेत 2.82% वाढ झाली असून आर्थिक वर्षात 337.17 कोटी रू.चा कर्ज पुरवठा संस्थेमार्फत करण्यात आला आहे. सभासदांना वेतनाच्या पटीत कर्जपुरवठा करण्याच्या महत्वाचा निर्णय विद्यमान संचालक मंडळाने घेतल्याचा फायदा सभासदांना होत आहे. संस्थेचे खेळते भांडवल 4.97% वाढले असून एकूण खेळते भांडवल 413.62 कोटी झाले आहे. व्यवस्थापन खर्च खेळत्या भांडवलाच्या केवळ 0.75 % तर वेतन खर्च 0.50% आहे. संस्थेच्या स्वनिधीमध्ये जवळपास 2.30 कोटींने वाढ झाली असून एकूण स्वनिधी 139.69 कोटी झाला आहे.संस्थेच्या गंगाजळीत जवळपास 1 कोटी रू. ने वाढ झाली असून 31 मार्च अखेर गंगाजळी 18.57 कोटी झाली आहे.
संस्थेने विकसित केलेल्या मोबाईल ॲप मुळे कर्ज भागणी पासून सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. सभासदांना पतपेढीतून राष्ट्रीयकृत अथवा अन्य बँकेत व राष्ट्रीयकृत अथवा अन्य बँकेतून पतपेढी रक्कम ऑनलाईन पाठविणे शक्य झाले आहे. संस्थेने स्वतःचे SSL प्रमाणपत्र घेतले आहे. गतसंचालक मंडळाच्या काळात तोट्यात आलेली सभासद सहाय्यता योजना नियोजनबद्ध कामकाजामुळे दि 31 मार्च अखेर तब्बल 61 लाख रु फायद्यात आली आहे. पोटनियमातील दुरुस्तीनुसार सभासदांच्या जमा निधीच्या प्रभाणात उन्हाळी सुट्टी सुरु होण्यापूर्वी बचत खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. सभासद हिताचे अनेक निर्णय संचालक मंडळाने घेतले असून निवडणूकी दरम्यान दिलेले सर्व शब्द काटेकोरपणे पाळले जात असल्याचे चेअरमन सागर पाटील यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ संचालक प्रदिप वाघोदे , माजी मानद सचिव व रत्नागिरी शाखा संचालक मुनव्वर तांबोळी , सचिव तातेज विचारे व लेखाधिकारी अशोक कांबळी उपस्थित होते.