इंटरनॅशनल अबॅकस वर्ल्ड कप स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते सन्मान
हेरले /(प्रतिनिधी):- स्किल शिक्षा मार्फत आयोजित इंटरनॅशनल अबॅकस वर्ल्ड कप या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या ए आर एस नवचेतना हेरलेच्या विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.
हा सोहळा अहिल्या मल्टीपर्पज हॉल, इचलकरंजी फाटा (अतिग्रे) येथे मोठ्या जल्लोषात पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अशोकराव माने उपस्थित होते. तसेच माजी सभापती राजेश पाटील, शकुंतला कुन्नुरे (सरपंच, रुई), सौ.राजश्री संतोष रुकडीकर (सरपंच, रुकडी), श्री.राहुल कुंभार (सरपंच, माले), संस्थापक- नितीन वर्मा, राकेश गुर्जर, राजगोंड पाटील (ज्येष्ठ पत्रकार), योगेश संभाजी कुंभार सर, राजकुमार बाळासो चौगुले, शैलेश संभाजी कुंभार, सचिन लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात खोत इंग्लिश मीडियम स्कूल रुकडी, आणि फिनिक्स स्कूल अतिग्रे, सह्याद्री विद्यानिकेतन सैनिक स्कूल माले, स्नेहल अकॅडमी स्कूल रुई, शांतिनाथ स्कूल इचलकरंजी, शिवमुद्रा स्कूल, आळते, ओम अबॅकस क्लासेस येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या विद्यार्थ्यांनी गणितीय कौशल्यांच्या जोरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत जागतिक स्तरावर उज्ज्वल कामगिरी केली. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके, ट्रॉफी आणि मेडल्स देऊन गौरविण्यात आले.
या यशामागे ए आर एस नवचेतना हेरलेचे डायरेक्टर अर्चना शैलेश कुंभार आणि स्वप्ना राजकुमार चौगुले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी घडवण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
संस्थेच्या वतीने भविष्यातही विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती करावी, अशा शुभेच्छा दिल्या.या सोहळ्यासाठी सर्व उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.