सायबर वॉरियर्सनी समाजामध्ये जनजागृती करावी-क्विक हिल फाउंडेशनच्या अनुपमा काटकर यांचे आवाहन- डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात सायबर वॉरियर्स क्लबचे उद्घाटन
नवे पारगाव :- आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे सायबर वॉरियर्स हे काम उत्तम पद्धतीने करतील असा विश्वास क्विक हिल फाउंडेशनच्या चेअरपर्सन अनुपमा काटकर यांनी व्यक्त केला.
क्विक हिल फाउंडेशनच्यावतीने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमातर्गत डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात सायबर वॉरियर्स क्लबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी काटकर बोलत होत्या. या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के प्रथापन, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, क्विक हिल फाउंडेशनचे कार्यकारी संचालक अजय शिर्के, सीएसआर प्रोजेक्टचे संचालक गायत्री पवार व वीरेंद्र आदी उपस्थित होते.
आजचे युग हे माहिती- तंत्रज्ञानाचे युग आहे. मात्र, प्रगत तंत्रज्ञाचा गैरवापर करून सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. बेकायदेशीर हॅकिंग, ऑनलाइन फ्रॉड्स यामुळे आपला डेटा सुरक्षित ठेवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी सायबर साक्षरता वाढवणे आवश्यक आहे. विद्यापीठात स्थापन झालेल्या या क्लबच्या माध्यमातून सर्व सायबर वॉरियर्स समाजामध्ये सायबर सुरक्षेचे महत्त्व पोहोचवण्याचे काम सक्षमपणे करतील. क्विक हिल कंपनीकडून सर्व महाविद्यालयांना मार्गदर्शन मिळणार आहे. कमवा व शिका या योजनेअंतर्गत या क्लबचे काम होणार असून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत सायबर सुरक्षेचे महत्त्व पोहोचणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे काटकर यांनी सांगितले.
अजय शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांना या क्लबच्या माध्यमातून स्वतःचे कौशल्य वाढवण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर समाजामध्ये जनजागृती करण्याचे व त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यात योगदान दिल्याचे समाधान मिळेल.
कुलगुरू प्रा.डॉ.के.प्रथापन म्हणाले, क्विक हिल फाउंडेशनचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. सायबर शिक्षा व सुरक्षा कार्यामध्ये योगदान देण्याची व या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे कार्य करण्याची संधी आमच्या विद्यार्थ्याना मिळणार आहे.
कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांनी “सायबर गुन्हे कसे होतात, ते कसे रोखता येतील याबाबत सायबर सुरक्षिततेची जाणीव या माध्यमातून रुजवली जाणार आहे. विद्यार्थ्यांची वैयक्तिक व सामाजिक प्रगती होण्यासाठी हातभार लागणार आहे.
सायबर क्लबचा प्रेसिडेंट महंमदअलि याने सायबर वॉरियर्स क्लबची तत्वे व मूल्ये याची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमास गोगटे महाविद्यालय रत्नागिरी, कमला महाविद्यालय कोल्हापूर, यशोदा टेक्निकल कॅम्पस, केबीपी महाविद्यालय, सातारा येथील सायबर वॉरियर्स व समन्वयक तसेच विद्यापीठाच्या संगणकशास्त्र व अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ.संग्राम पाटील व सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संगणकशास्त्र व अभियांत्रिकी विभागातील डॉ. वर्षा देसाई व सायबर क्लबचे विद्यार्थी यांनी केले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.