Home Breaking News घोडावत विद्यापीठात जर्नालिझम, मास कम्युनिकेशन पदवी अभ्यासक्रम-कुलगुरू प्रो.उद्धव भोसले

घोडावत विद्यापीठात जर्नालिझम, मास कम्युनिकेशन पदवी अभ्यासक्रम-कुलगुरू प्रो.उद्धव भोसले

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

संजय घोडावत विद्यापीठात जर्नालिझम, मास कम्युनिकेशन पदवी अभ्यासक्रम- कुलगुरू प्रो.उद्धव भोसले माध्यम क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी

 

 

 

 

 

 

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- सध्या प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून एकमेकांशी जोडला गेलेला आहे. यासाठीचं प्रमुख कारण म्हणजे संवाद! माणसाला जशी अन्न वस्त्र निवाऱ्याची आवश्यकता असते तशी संवादाची असते.संवादातून आपण ज्ञान,माहिती,मनोरंजन करत एकमेकांच्या भावभावनांना वाट मोकळी करून देतो.पशु पक्षांपासून मानवांपर्यंत सर्वजण एकमेकांना माहिती पोहोचवतात,त्यासाठी संवाद साधतात. हा संवाद साधताना कुठल्या ना कुठल्या माध्यमाची आवश्यकता असते. मानवाच्या सुरुवातीच्या काळात तो हात वारे करायचा, विशिष्ट आवाज काढायचा, नंतर भाषा,लिपी ही माध्यमं संवादासाठी आली. सध्याच्या काळात संवादासाठी तंत्रज्ञानाची मदत होते. त्याचा विस्तार एवढा वाढला आहे की मानवाचे दैनंदिन जीवन यावर अवलंबून आहे.यामुळे माध्यम क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी जर्नालिजम आणि मास कम्युनिकेशन या शाखेत पदवी आणि पदव्युत्तर शाखेत शिक्षण घेऊन माध्यम क्षेत्रात करिअर करता येते.

Advertisements

 

मुद्रित माध्यमे व ब्लॉगिंग–

 

सुरुवातीच्या काळात माहिती पोहोचवण्यासाठी,जनसंवादासाठी मुद्रित माध्यमाची निर्मिती झाली.या क्षेत्रात आज देखील नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मुद्रित माध्यमात वृत्तपत्रे,नियतकालिके यांचा समावेश होतो. बातमीदारी, संपादन, स्तंभलेखन, डीटीपी, मुद्रित शोधन भाषांतर,छायाचित्रण, मार्केटिंग, व्यवस्थापन यामध्ये कुशल मनुष्यबळाची गरज असते.शहर आणि ग्रामीण पत्रकार, उपसंपादक, वृत्त संपादक, छायाचित्रकार, स्तंभलेखक इत्यादींची आवश्यकता मुद्रित माध्यमात असते. लेखनासह संगणकीय ज्ञान, भाषांतराची कला, पेज डिझाईन, लेआउटची कला असणे गरजेचे असते.

 

ब्लॉगिंग द्वारे व सोशल मीडिया द्वारे सिटीजन जर्नालिस्ट म्हणून आपल्याला स्वयंरोजगार उपलब्ध होऊ शकतो.

 

रेडिओ व पॉडकास्ट–

 

जनसंवादाचे एक सशक्त माध्यम म्हणून रेडिओकडे आजही पाहिले जाते. आजही काही राष्ट्रांचे प्रमुख जनसंवादासाठी या माध्यमाचा उपयोग करतात. सरकारी आणि खाजगी रेडिओ क्षेत्रात करिअर करता येऊ शकते. यामध्ये आकाशवाणी, कम्युनिटी रेडिओ, खाजगी एफएम चॅनेल्स, इंटरनेट रेडिओ क्षेत्रात आरजे, कार्यक्रम निर्माता, आशय निर्माता, जाहिरात निर्माता म्हणून करिअर करता येते. यासाठी विविध विषयावर लेखन आवाजाची जपणूक,विविध उपकरणे, सॉफ्टवेअर हाताळण्याचे तांत्रिक कौशल्य असणे गरजेचे असते.

 

सध्या पॉडकास्ट द्वारे ऑडिओ कन्टेन्ट ऐकणाऱ्यांची संख्या जागतिक पातळीवर वाढत आहे. या क्षेत्रात स्वयंरोजगारद्वारे करिअर करता येते. रेडिओ साठी आवश्यक असणारी कौशल्ये यासाठी उपयोगी पडतात.

 

टेलिव्हिजन–

 

जगामध्ये खाजगी आणि सरकारी दूरचित्रवाणी वाहिन्यांचे जाळे पसरले आहे. भारतात दूरदर्शन आणि खाजगी टीव्ही चॅनेल्स मध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. यामध्ये राष्ट्रीय, प्रादेशिक जिल्हास्तरावर टीव्ही क्षेत्रात करिअर करता येते. केबल,डीटीएच,यूट्यूब, इंटरनेट टीव्ही च्या माध्यमातून हे क्षेत्र प्रचंड विस्तारले आहे. 24 तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या, मनोरंजनामध्ये दैनंदिन मालिका, संगीत व चित्रपट विषयाला वाहिलेल्या वाहिन्या, अर्थविषयक,अध्यात्म,क्रीडाविषयक चॅनेल्स मध्ये करिअर करता येते. यामध्ये दिग्दर्शक, अँकर, रिपोर्टर, संहिता लेखक, व्हिडिओ जॉकी, तांत्रिक सहाय्यक, प्रोमो प्रोडूसर, साऊंड डिझाईन म्हणून करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

 

चित्रपट—

 

मानवी जीवनात चित्रपटांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजाचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये उमटत असते. या क्षेत्रात जागतिक पटलावर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मार्गदर्शन व कौशल्याची आवश्यकता असते. थेरी व प्रॅक्टिकल प्रशिक्षणाद्वारे कौशल्य प्राप्त करता येतात. यासाठी तांत्रिक ज्ञान देखील महत्त्वाचे आहे. संहिता, कथा-पटकथा- संवाद लेखन,दिग्दर्शन,कॅमेरामन, मेकअप आर्टिस्ट, साऊंड आर्टिस्ट,सेट डिझाईन,एडिटर विभागात रोजगार उपलब्ध आहेत. सध्या शॉर्ट फिल्म निर्मितीमध्ये युवकांचा सहभाग वाढत आहे.या माध्यमातून देखील या क्षेत्रात करिअर करता येते.

 

जाहिरात व जनसंपर्क

 

खरेदी विक्री करणाऱ्या कोणत्याही संस्था संघटनांना जाहिरात व जनसंपर्काची आवश्यकता असते. सरकारी व खाजगी पातळीवर या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. जनसंपर्क क्षेत्रात शासकीय, सहकार,शिक्षण, बँकिंग,कॉर्पोरेट, महामंडळ, आरोग्य विभाग या ठिकाणी जनसंपर्क अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, माहिती अधिकारी, जनसंपर्क सल्लागार यासारख्या पदावर कार्य करता येते. केंद्र सरकारच्या प्रसार यंत्रणेत कार्य करण्यासाठी इंडियन इन्फॉर्मेशन सर्विसेस ही स्पर्धा परीक्षा आहे.ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो,रजिस्टर ऑफ न्यूज पेपर्स, ब्युरो ऑफ आउटरिच अँड कम्युनिकेशन यासह विविध कार्यालयात महत्त्वाच्या पदावर नोकरी करता येते.

 

विविध कंपन्या वस्तू सेवा आणि उत्पादन वाढीसाठी जाहिरातीचा अवलंब करतात. यासाठी रेडिओ, टीव्ही,मुद्रित व वेब माध्यमावर जाहिराती देतात. जाहिरात ही एक कला आहे. यासाठी विशिष्ट कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असते. कल्पकता,सर्जनशीलता अशा गुणाद्वारे सरकारी,खाजगी क्षेत्रात करिअर करता येते. यामध्ये स्वतःची जाहिरात संस्था काढून सेवा देता येते.

 

डिजिटल माध्यमे—

 

इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे जनसंवाद क्षेत्रात मोठी उत्क्रांती झाली आहे.मोबाईल युगात डिजिटल माध्यमांचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. सोशल मीडियामुळे हे क्षेत्र विस्तारले आहे. जागतिक पातळीवर स्मार्टफोन, मोबाईल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सोशल मीडिया मार्केटिंग ची गरज,सरकारी व खाजगी संस्थांना आवश्यक वाटू लागली आहे. एवढेच नाही तर मुद्रित इलेक्ट्रॉनिक माध्यमे याकडे आकर्षित झाली आहेत. यासाठी माध्यम तज्ञांची गरज आवश्यक आहे.ई-पेपर,वेब पोर्टल, वेबसाईट, विविध ॲप्स,व्हॅडकास्टर्स,युट्युबर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी खास सुविधा केंद्रे उपलब्ध झाली आहेत.यामध्ये करिअर करताना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध आहे.

 

माध्यम संशोधन—

 

जन माध्यमाद्वारे ज्ञान,माहिती, मनोरंजन जनांपर्यंत आपण पोहोचवत असतो.

 

कार्यक्रमाचा आशय विषय, माध्यमांची पोहोच, वापरकर्त्यांच्या आवडीनिवडी समजण्यासाठी माध्यम संशोधनाची गरज असते. यासाठी विविध माध्यमे,खाजगी व शासकीय यंत्रणा संशोधन कार्य करीत असतात. यासाठी माध्यम संशोधनाचे ज्ञान असणाऱ्या युवक- युवतींना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. शैक्षणिक क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी सेट/ नेट /पीएचडी द्वारे विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करता येते.

 

ग्राफिक डिझाईन व फोटोग्राफी–

 

विविध संस्था, संघटना,उद्योग क्षेत्रांना लोकांपर्यंत आपल्या वस्तू व सेवांकडे आकर्षित करण्यासाठी ग्राफिक डिझाईन चा उपयोग केला जातो. यासाठी पॅम्प्लेट, लीफलेट,ब्रोशर,पोस्टर ची आवश्यकता असते. याच्या निर्मितीसाठी विशेष प्रशिक्षण व कौशल्याची आवश्यकता असते. डिजिटल माध्यमाद्वारे हे कार्य सुरू असते.

 

फोटोग्राफी हा व्यवसाय सध्या वाढताना दिसत आहे. प्री-वेडिंग, वेडिंग, पोस्ट वेडिंग च्या माध्यमातून फोटोग्राफीला चांगले दिवस आले आहेत. तसेच प्रॉडक्ट फोटोग्राफी, फॅशन फोटोग्राफी, नेचर फोटोग्राफी,स्पोर्ट फोटोग्राफी च्या माध्यमातून करिअरच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. फोटो जर्नलिस्ट म्हणून देखील मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व शासकीय क्षेत्रात करिअर करता येते.

 

अँकरिंग/ सूत्रसंचालन–

 

अँकरिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्तम संवाद कौशल्याची आवश्यकता असते. स्थानिक,राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालकाची आवश्यकता असते. कोणताही शासकीय, खाजगी, स्थानिक कार्यक्रम, उत्तम निवेदकाशिवाय पार पडत नाही. अँकरिंग ची कौशल्य प्राप्त असणाऱ्यांसाठी आवाजाच्या क्षेत्रात उत्तम संधी उपलब्ध आहेत. विविध न्यूज चॅनेल्स मध्ये न्यूज अँकर,आरजे,व्हाईस ओव्हर आर्टिस्ट,व्हॉइस ऍक्टर म्हणून देखील करिअर करता येते.वरील सर्व क्षेत्रात करिअर करण्यासाठी विशिष्ट पदवीची आणि कौशल्याची आवश्यकता असते.

 

नवीन शैक्षणिक धोरणानुसार संजय घोडावत विद्यापीठातील स्कूल ऑफ मीडिया मध्ये बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना बी.ए जर्नालिजम अँड मास कम्युनिकेश या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. मीडिया क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी पदवी अभ्यासक्रमाची आवश्यकता आहे. यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान, स्टुडिओ, तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध असल्याची माहिती कुलगुरू प्रो. उद्धव भोसले यांनी दिली आहे.

 

माध्यमांचा वाढता विस्तार पाहता या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी करिअरची नवी संधी म्हणून पाहायला हवे.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements