ए.आर-व्ही.आर ARVR मध्ये करिअरच्या अगणित संधी-केशवराव भोसले नाट्यगृहातील सेमिनारमध्ये तज्ञांचे प्रतिपादन
कोल्हापूर,(प्रतिनिधी):-ऑगमेंटेड रिऍलिटी (ए.आर.) व व्हरच्युअल रिऍलिटी(व्हीआर) ARVR सारख्या इमर्सिव्ह तंत्रज्ञान आणि मल्टीमीडियामध्ये करिअरच्या अगणित संधी उपलब्ध असून भविष्यात हे क्षेत्र अधिकच विस्तरणार असल्याचे प्रतिपादन या क्षेत्रातील तज्ज्ञ अनुकूल कुकडे, रंजीत गोसावी, साकेत सबनीस यांनी केले. डी.वाय.पाटील DYPL Patil कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
या कार्यशाळेत बारावीनंतर एआर व्हीआर मधील करिअर संधी, त्याची व्याप्ती, भविष्यातील विस्तार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. याला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आली. या कार्यक्रमाचे कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यशाळेमागची पार्श्वभूमी आणि भविष्यातील महत्व विशद केले. त्याचबरोबर या वर्षापासून विद्यापीठात बीएससी इन एआर -व्हीआर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असल्याचे सांगितले.सहाय्यक प्राध्यापक नरेश कांबळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
ट्रायोडोक्सीक स्टुडिओचे संस्थापक अनुकूल काकडे यांनी ऍनिमेशन आणि गेमिंग मध्ये कोणकोणत्या संधी आहेत याविषयी मार्गदर्शन केलं. पोकेमोन गो सारख्या गेममध्ये एआरचा वापर करण्यात आला असून गेमिंगसाठी याचा उपयोग होतो. तर व्हिआरचां वापर रिटेल इंडस्ट्री, एज्युकेशन, हेल्थकेअर, डिफेन्स, इंडस्ट्री या सगळ्या क्षेत्रांमध्ये होत आहे. आभासी जगात नेऊन ठेवणारे हे तंतज्ञान सतत विस्तारत असल्याचे त्यांनी सांगितले
व्हीएफएक्स-डीएफएक्स कंपनीचे संस्थापक रणजित गोसावी यांनी, व्हीएफएक्स आणि डीएफएक्स तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. ड्रायव्हिंग लायसन टेस्टमध्ये आभासी जग निर्माण करून कशा पद्धतीनं ट्रेनिंग दिलं जातं, ते सहउदाहरण स्पष्ट केले. या सर्वांचा वापर इंटरटेनमेंट, चित्रपट क्षेत्रात याचा सर्वाधिक वापर होतो. त्याचबरोबर जाहिरात, आरोग्य, शिक्षण, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, ई-कॉमर्स, कन्स्ट्रक्शन, टुरिझम अशा विविध क्षेत्रांमध्ये होत असल्याचे त्यांनी सांगितले.
रेड कार्पेट एडव्हेंचे संस्थापक साकेत सबनीस यांनी, ॲनिमेशन फक्त कार्टून असा खूप मोठा गैरसमज असल्याचं त्यांनी सांगितले. आपल्या विचारांना प्रत्यक्षात उतरण्याचं साधन म्हणजे ॲनिमेशन आहे.जाहिराती मध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. या क्षेत्रासाठी आवश्यक सॉफ्ट स्किल आणि कौशल्यांची माहिती देऊन त्यातील संधिबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचं तज्ञानी निरसन केलं.
यावेळी डी.वाय.पाटील कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, सहा. प्रा. नरेश कांबळे, संदीप रबाडे, कुणाल पाटील यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.