विभागात दहावी परीक्षेत कॉपी प्रकरणांचा रकाना निरंकच!
बारावी परीक्षेत सातारा निरंक, कोल्हापूर एक, तर सांगलीत सहा प्रकरणे
कोल्हापूर / (प्रतिनिधी):- विभागीय मंडळाने विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये परीक्षेपूर्वी अडीच महिन्यांपासून विविध उपक्रमाद्वारे सुरू केलेली जागृती, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समित्यांचे योग्य नियोजन, परीक्षा संचालनातील सर्व घटकांनी यथोचित पार पाडलेली जबाबदारी यामुळे यंदाही दहावी बोर्ड परीक्षेतील कॉपी प्रकरणांचा कोल्हापुर विभागाचा रकाना निरंकच राहिला आहे. तर बारावी परीक्षेत विभागात सात प्रकरणांची नोंद झाली असून सर्व सात प्रकरणे प्रतिबंधात्मक कारवाईशी निगडित आहेत.
विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सुरू केलेल्या परीक्षाविषयक गुणात्मक उपक्रमामुळे विभागातील शाळा, विद्यार्थी व पालकांच्याही मानसिकतेत बदल झाल्याचे दिसून येत असून यंदा प्रथमच कॉपीमुक्त परीक्षा अभियान खऱ्या अर्थाने प्रभावी ठरले आहे.
विभागीय अध्यक्ष क्षीरसागर यांनी पदभार घेतल्यापासूनच गैरप्रकारमुक्त परीक्षेची पार्श्वभूमी तयार करण्यास सुरुवात केली. यासाठी विविध परीक्षांमध्ये राज्यस्तरावर केलेल्या कामकाजाचा तगडा अनुभव त्यांच्या कामी आला. विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात जिल्हास्तरावर सर्व शाळाप्रमुखांची ऑफलाईन बैठक घेऊन विभागीय मंडळाच्या योजना व परीक्षेविषयी इत्यंभूत माहिती दिली. परीक्षेत गैरप्रकार घडल्यास कारवाईचा इशाराही दिला. जिल्हास्तरावरील बैठकी प्रमाणेच शाळास्तरावर संयुक्त बैठक घेऊन विद्यार्थी- पालक – शिक्षक यांच्यामध्ये जागृती करण्याबाबत निर्देश दिले. त्याच जोडीला कॉपीमुक्तीची शपथ सर्व विद्यार्थ्यांना देण्याबाबत निर्देश दिले. ताणतणावमुक्त परीक्षा कशी देता येईल, प्रत्येक विषयाच्या उत्तरपत्रिकांचे लेखन अचूकपणे कसे करावे, परीक्षापूर्व व परीक्षा काळात घ्यायची आरोग्य व आहाराची काळजी याबाबत तिन्ही जिल्ह्यात स्वतंत्रपणे स्थानिक तज्ञांच्या मदतीने ऑनलाइन चर्चासत्रे आयोजित केली, त्याचे थेट प्रक्षेपण शाळाशाळांमधून केले गेले.
*विभागातील उपक्रमांची दखल अन् राज्यस्तरावर अवलंब*
गैरप्रकारमुक्त परीक्षेच्या अनुषंगाने कोल्हापूर विभागात घेण्यात आलेल्या उपक्रमाप्रमाणेच राज्यस्तरावर कॉपीमुक्त परीक्षा अभियान २० ते २६ जानेवारी या कालावधीत घेण्यात आले. राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला सामोरे जाताना … या विषयावर स्वतंत्रपणे कोल्हापुरातील विषयतज्ञांच्या मदतीने विभागीय मंडळाने व्हिडिओ तयार केला. तो राज्यमंडळाने सर्वांसाठी यूट्यूबवर उपलब्ध करून दिला. राज्यभरातून या उपक्रमाचे स्वागत झाले. या ध्वनिचित्रफिती शाळा शाळांमधून दाखवण्यात आल्या. दहावीच्या ध्वनीचित्रफितीस तर एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले.
कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आयोजित केलेल्या सप्ताहातील सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन म्हणजे शिक्षासूची वाचन, उत्तरपत्रिकेवरील सुचना वाचन, पालक सभा, ग्रामस्थ सभा, प्रभात फेरी, उद्बोधनवर्गाचे आयोजन करण्यात आले.
*चालू वर्षी खऱ्या अर्थाने परीक्षा*
कोल्हापूर विभागीय मंडळाची स्थापना सन १९९२ मध्ये झाली असून त्यावेळी मंडळात सातारा, सांगली, कोल्हापूर,रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांचा समावेश होता. सन २०१२ मध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे कोकण विभागीय मंडळ स्थापित झाले. बोर्ड परीक्षेचे गांभीर्य विविध कारणांनी मागील १० ते १५ वर्षात कमी होत गेले. कोरोना कालावधीपासून तर त्यात फारच शिथिलता आली. पर्यायाने शिस्त व अभ्यासावर विपरीत परिणाम होऊ लागला.
यावर्षी विभागाने घेतलेल्या कडक भूमिकेनंतर शाळांनी सराव व उजळणी दक्षतापूर्वक घ्यायला सुरुवात केली, विद्यार्थी अभ्यासाला लागले, शिस्तीतही सुधारणा होताना दिसत आहे.चालू वर्षाच्या परीक्षेत परीक्षा केंद्रावर पेपरच्या काळात निरव शांतता दिसून आली. केंद्राबाहेरील पळापळ आणि अंतर्गत चलबिचल जवळपास संपुष्टात आली. एरवी दिसणारे पुस्तकांचे व कॉपीचे ढीग गायब झाले. गैरप्रकार करणारे, उत्तेजन देणारे आणि मदत करणारे यावर गुन्हे दाखल करण्याबाबत आणि परीक्षा केंद्र रद्द करण्याबाबत दिलेल्या इशाऱ्याचाही सुपरिणाम दिसून आला. परीक्षा संचलन करणाऱ्या केंद्रसंचालक, वर्गावरील सुपरवायझर यांचेही काम सोपे झाले. त्यामुळे यंदाची बोर्ड परीक्षा खरी कसोटी ठरल्याच्या प्रतिक्रिया सर्व घटकातून येत आहेत.
*विभागीय मंडळ आणि जिल्हा दक्षता समित्यांचा समन्वय*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी १०० दिवसाच्या कृती कार्यक्रमातील कॉपी विरोधी अभियान या कृतीकार्यक्रमाची अंमलबजावणी करताना इयत्ता इ. १० वी व इ.१२वी च्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडणे हे आव्हान मंडळासमोर होते. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त एस पी सिंग,राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.
विभागीय मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी किमान सात भरारी पथकांचे नियोजन केले जाते. तथापि चालू वर्षी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ऑनलाइन बैठकीद्वारे परीक्षेत गांभीर्यपूर्ण लक्ष देण्याबाबत निर्देश दिले होते. त्यामुळे जिल्हास्तर, तालुकास्तरावरून महसूल व इतर अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली. सर्व केंद्रांवर बैठी पथके नेमण्यात आली. भरारी पथकांची संख्या वाढल्याने प्रत्येक केंद्रावर भेट देण्याचे नियोजन करण्यात आले होते. साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यात विशेष लक्ष घातले होते.
तर उपद्रवी व संवेदनशील केंद्रांबाबत विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष होते. मागील पाच वर्षात गैरप्रकार घडलेल्या केंद्रांवरील केंद्रसंचालकांसह सर्व कर्मचारी वर्ग बदलण्यात आल्याने त्याचाही धाक निर्माण झाला. संवेदनशील केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण ही करण्यात आले. दुर्लक्षित असलेल्या बारावी ऑनलाईन परीक्षेतबाबतही सूक्ष्म नियोजन करण्यात आले. परीक्षा कालावधीत पेपर दिवशी सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, सांगली राजेसाहेब लोंढे, कोल्हापूर डॉ. एकनाथ आंबोकर यांच्याशी सातत्याने होणाऱ्या छोटेखानी ऑनलाईन बैठका फायदेशीर ठरल्या.
*दहावी परीक्षेत कॉपीमुक्तीची हॅट्रिक*
चालूवर्षीसह मागील तीन परीक्षेत कोल्हापूर विभागात दहावी परीक्षेत एकाही प्रकारची नोंद नाही, यात विभागाने हॅट्रिक साधली आहे. जिल्हानिहाय विचार करता मागील पाच दहावीच्या बोर्ड परीक्षेत सांगली जिल्ह्यात एकाही प्रकाराची नोंद नाही.
मागील बारावीच्या दोन बोर्ड परीक्षेत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात एकाही कॉपीप्रकाराची नोंद नव्हती. चालू वर्षी सांगली सहा व कोल्हापूर एका प्रकाराची नोंद झाल्याने दोन्ही जिल्ह्यांची हॅट्रिक हुकली आहे. साताऱ्यात बारावी परीक्षेत मागील व चालू वर्षी एकही प्रकाराची नोंद नाही. चालू वर्षीच्या परीक्षेत विभागात बारावी परीक्षेत सात प्रकाराची नोंद झाली असून सांगलीतील सहा प्रकार रसायनशास्त्र व कोल्हापुरातील प्रकार गणित पेपरवेळी झाले आहेत. त्यांच्यावर मंडळ नियमानुसार कारवाई होणार आहे.
लगतच्या कॉपीमुक्त मुक्त परीक्षेची संस्कृती रुजलेल्या कोकण विभागीय मंडळात केवळ एका कॉपी प्रकाराची नोंद असून राज्यात कॉपीमुक्तीत कोकण मंडळ अव्वल स्थानी आहे, तर कोल्हापूर विभागीय मंडळ दुसऱ्या स्थानी आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
“चालू वर्षाच्या परीक्षेत अनेक सकारात्मक बाबी पुढे आल्या आहेत, क्षेत्रिय यंत्रणेचे चांगले सहकार्य मिळाल्याने गैरप्रकारमुक्त परीक्षा घेण्यात यश आले.
-सुभाष चौगुले, विभागीय सचिव.
“विद्यार्थी पालकांसह परीक्षेशी संबंधित सर्व यंत्रणांची मानसिकता बदलण्यात बऱ्याच अंशी यश आले. परीक्षा देणाऱ्या व घेणाऱ्या या दोन्ही घटकांचा यावर्षी कस लागला. निकालानंतर येत्या शैक्षणिक वर्षात अभियानाचे दूरगामी व इष्ट परिणाम दिसतील.
-राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण मंडळ