खोची येथील पेंढारी मळा, जुना कोल्हापूर रस्ता अतिक्रमण मुक्त
खोची, (भक्ती गायकवाड) : राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या वतीने पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रम सुरू आहे. यामधून खोची ता.हातकणंगले येथील पेंढारी मळा जुना पेठ वडगाव कोल्हापूर रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात आला.या रस्त्याचे लोकार्पण कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी कुंभोज मंडल अधिकारी अरुण शेट्टी,महसूल अधिकारी प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.प्रा. बी.के चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ श्रीफळ वाढविण्यात आला.यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सूर्यवंशी, ग्रामपंचायत अधिकारी आर.एस.मगदूम,पोलीस पाटील मनोज सपकाळ,डी.एस.पाटील, विवेक कुलकर्णी,दादासो पाटील,सर्जेराव माने,माणिक ढाले,अमोल मगदूम,पोपट पाटील,वैभव पाटील,पोपट गुरव, संदीप लाटवडे आदी उपस्थित होते.
खोची येथील पेंढारी मळा जुना पेठ वडगाव कोल्हापूर हा रस्ता अनेक दिवसापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या अतिक्रमणाने लुप्त झाला होता. या रस्त्यालगत वास्तव्य तसेच शेती असणाऱ्या ग्रामस्थांना मोठी अडचण होत होती. ये- जा करण्यापासून शेती मशागत, शेतमाल बाहेर काढणे जिकीरीचे झाले होते. याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. दुतर्फा अतिक्रमण काढून शेतकऱ्यांसाठी, ग्रामस्थांसाठी रस्ता खुला करण्यात आला.
या रस्त्याबाबत राज्य शासनाच्या अतिक्रमण मुक्त पाणंद धोरणानुसार शेतकऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेसह कोल्हापूर जिल्हाधिकारी, हातकणंगले तहसीलदार आणि महसूल सेवक यांना अर्ज करून रस्ता खुला करून देण्याची मागणी केली. त्यानुसार नायब तहसीलदार संदीप चव्हाण,मंडल अधिकारी अरुण शेट्टी,महसूल अधिकारी प्रमोद पाटील यांच्या पथकाने शेतकऱ्यांना रस्ता खुला करून दिला. शेतकऱ्यांनी लोकवर्गणी काढून जेसीबीच्या साह्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणे काढून सपाटीकरण करून रस्त्याची डागडुजी करून घेतली. यासाठी आप्पासो पेंढारी, प्रमोद सूर्यवंशी,तात्यासो पेंढारी, संभाजी घोडके,गणपती सपकाळ,दिलीप जाधव,शकील पेंढारी, इकबाल पेंढारी, महसूल सेवक अर्चना आडके,योगेश कांबळे, हनमंत आडके आदीनी पाठपुरावा केला.शेत शिवारातील अन्य पाणंद रस्ते लवकर मुक्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.