Home कोल्हापूर जिल्हा शिवाजी विद्यापीठमध्ये बुद्धिबळ अभ्यासक्रमाचा समावेश व्हावा – गिरीश चितळे

शिवाजी विद्यापीठमध्ये बुद्धिबळ अभ्यासक्रमाचा समावेश व्हावा – गिरीश चितळे

शिवाजी विद्यापीठमध्ये बुद्धिबळ अभ्यासक्रमाचा समावेश व्हावा – गिरीश चितळे

 

 

कोल्हापूर, दि.16 :- महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना शाळेत बुद्धिबळ हा महत्त्वकांक्षी उपक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा नव्या जोमाने सुरु करत आहे. त्यासाठी आवश्यक ट्रेन द ट्रेनर्स कॅम्प महाराष्ट्रात पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे, नागपूर,जळगाव, नांदेड व रायगड या आठ जिल्ह्यात आयोजित केला आहे. त्यापैकी पहिला कोल्हापूरमधील विवेकानंद कॉलेजमध्ये चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेला ट्रेन द ट्रेनर्स कॅम्प आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शिबिरासाठी विवेकानंद कॉलेजचे व संस्थेचे विशेष सहकार्य लाभले. चेस इन स्कूल हा उपक्रम भारतात पहिल्यांदा महाराष्ट्रात महाराष्ट् बुद्धिबळ संघटनेने 2014 पासून सुरू केला आहे. भारतीय महिला बुद्धिबळ संघाचे मुख्य प्रशिक्षक व मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सन्मानित ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे यांच्या संकल्पनेतून जागतिक बुद्धिबळ संघटनेचा (फिडे ) “चेस इन स्कूल” 2014 पासून भारतात प्रथम महाराष्ट्रात सुरू झाला.. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष व आधारस्तंभ अशोकभाऊ जैन यांनी या उपक्रमासाठी जैन इरिगेशनची स्पॉन्सरशिप दिली आहे.

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष व चेस इन स्कूल कमिटीचे चेअरमन गिरीश चितळे, शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शरद बनसोडे, शिवाजी विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य सिद्धांत शिंदे व विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या शुभहस्ते बुद्धिबळाच्या चुंबकीय प्रदर्शन पटावर चाल करून ट्रेन द ट्रेनर्स कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.. यावेळी विवेकानंद कॉलेजची क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ.विकास जाधव, विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक संतोष कुंडले, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव व चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, सचिव व प्रशिक्षक मनिष मारुलकर, मुख्य प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे, उपाध्यक्ष धीरज वैद्य व राष्ट्रीय पंच आरती मोदी व्यासपीठावर उपस्थित होते.

सुरुवातीला प्रास्ताविक व स्वागत मध्ये चेस असोसिएशन कोल्हापुरचे अध्यक्ष व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचा आजपर्यंतचा “चेस इन स्कूल” या महत्वकांक्षी प्रकल्पाचा आढावा घेतला व चेस इन स्कूल बरोबर ट्रेन द ट्रेनर्स या कार्यशाळेचे महत्त्व विशद करून सर्व मान्यवरांचे स्वागत केले..

त्यानंतर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष व चेस इन स्कूल कमिटीचे चेअरमन गिरीश चितळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करताना म्हणाले…. 2024 हे वर्ष भारतीय बुद्धिबळासाठी ऐतिहासिक ठरले आहे यावर्षी झालेला 187 देश सहभागी असलेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाड मध्ये नेत्रदिपक कामगिरी करत भारतीय पुरुष व महिला संघाने सुवर्णपदक पटकाविले व नुकत्याच झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आव्हानवीर 18 वर्षाच्या डी.गुकेशने गत विजेत्या चायनाच्या लिरेन डिंगला नमवून विश्वविजेतेपद पटकाविले व कमी वयातील विश्वविजेता बनण्याचा विक्रम केला.

अशाप्रकारे भारत आता बुद्धिबळामध्ये जगात अग्रस्थानी आहे. 2014 पासून महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने *”चेस इन स्कूल”(शाळेत बुद्धिबळ)* हा जागतिक बुद्धिबळ संघटनेचा उपक्रम भारतात प्रथम महाराष्ट्रात सुरू झाला. मध्यंतरी करोनामुळे व अन्यकाही कारणामुळे हा उपक्रम होऊ शकला नाही. येत्या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा नव्या जोमाने महाराष्ट्रातील साधारण 500 हून अधिक शाळेत बुद्धिबळाचा प्राथमिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचा मानस आहे..शिवाजी विद्यापीठाचे डॉ.शरद बनसोडे यांच्या आग्रहास्तव भविष्यात चेस इन कॉलेज/युनिव्हर्सिटी हा उपक्रम देखील महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना राबवेल. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश झाला तर छत्रपती शिवाजी विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ ठरेल…या दृष्टीने जास्तीतजास्त बुद्धिबळपटू, क्रीडा शिक्षक इतर शिक्षकानी ट्रेन द ट्रेनर्स शिबिरात सहभागी व्हावे व प्राविण्य प्राप्त करावे.शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी विद्यार्थी जीवनात बुद्धिबळ खेळ आत्मसात करणे खूप गरजेचे आहे.. बुद्धिबळामुळे एकाग्रता, संयम, नियोजन, धोरण,सावधानता, धाडस व गणिती कौशल्य,शैक्षणिक दर्जा वाढविण्यास व मोबाईलच्या अनावश्यक छंदापासून पासून विद्यार्थ्यांना मुक्ती मिळवण्यासाठी खूप आवश्यक आहे .. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये बुद्धिबळाचा समावेश होण्याच्या दृष्टीने व महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शाळांमध्ये बुद्धिबळाच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यासाठी मी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेला व चेस असोसिएशन कोल्हापूरला निश्चित सहकार्य करुन पाठपुरावा करेन असे सांगितले.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावङे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. मला खेळाची जास्त आवड असून मी स्वतः क्रिकेट, आर्चरी व बुद्धिबळ खेळतो.. त्याचबरोबर विविध खेळांच्या जिल्हा व राज्य संघटना पदावर कार्यरत आहे… शाळेत बुद्धिबळ हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे..अशा उपक्रमासाठी विवेकानंद संस्थेची दरवाजे सदैव खुली आहेत..

शेवटी शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे म्हणाले की, विशिष्ट अभ्यासक्रम व परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देणे हे फक्त योगासना मध्येच नाही तर बुद्धिबळ या खेळात पण आहे हे पाहून मी प्रभावित झालो आहे. असे उपक्रम भविष्यात कॉलेज व शिवाजी विद्यापीठात राबविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत… त्यासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने आवश्यक पूर्तता करावी….

या शिबिरासाठी कोल्हापूर, इचलकरंजी, चंदगड, आजरा, सांगली, सातारा, फलटण, दापोली येथील बुद्धिबळ प्रेमी शिक्षक, क्रीडा शिक्षक व पालक सहभागी झाले होते. कोल्हापुरातील नामवंत बुद्धिबळाचे मुख्य प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे व मनीष मारुलकर या दोघा 2000 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय गुणांकन असणाऱ्या प्रशिक्षकांनी सहभागी शिबिरार्थीना जवळजवळ सात तासाचे प्रशिक्षण दिले व शेवटी शंभर गुणाची परीक्षा घेतली.. दोन-चार दिवसानंतर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना या शिबिरात प्राविण्य प्राप्त केलेल्यांना प्रशस्तीपत्र देणार आहे.