कोल्हापूर : शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सर्व साधरण सभेला कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दि. ५ मार्च रोजी परवानगी दिली. मात्र या सभेलाच आक्षेप घेत संस्थेचे सभासद दस्तगिर बाणदार यांच्यावतीने अँड. धैर्यशील सुतार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संस्थेचे सुमारे ३२ हजार सभासद एकत्र जमा झाले तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढेल. तसेच जर ऑनलाईन सभा घेण्याचा घाट घातला तर या कारखान्यांचे बरेच सभासद हे ग्रामीण भागातील शेतकरी असून यांच्याकडे इंटरनेट तसेच मोबाईल सुविधा नाहीत.
कोरोनामुळे जिल्ह्यात तसेच स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारे जमाव जमा करण्यास मनाई केली असतानाही जिल्हाधिकारी देसाई यांनी या सभेला ही परवानगी कशी दिली असा सवाल याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच दत्त सहकारी साखर कारखाना हा बहुराज्यस्तरीय सहकारी संस्था या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असल्याने राज्य सरकारचे आदेश या संस्थेला लागू होत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी देसाई यांना परवानगी देण्याचा अधिकारच नाही. असा दावाही याचिकेतून करण्यात आलेला आहे.
या सर्वसाधारण सभेत मूलभूत धोरणात्मक निर्णय घेण्याचा घाट घालण्यात येणार असल्याने सभा घेण्यास मनाई करावी, अशी विनंती याचिकेतून कऱण्यात आलेली आहे. सदर याचिकेवर न्यायमुर्ती आर. डी. धनूका आणि न्यायमुर्ती व्ही. जी. बीस्ट यांच्या खंडपीठासमोर आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता तातडीने सुनावणी पार पडणार आहे .