किणी घुणकी परिसरात गव्याचे दर्शन

    घुणकी : दोन महिन्यांपूर्वी किणी घुणकी परिसरात गव्यांनी नागरी वस्तीत प्रवेश केला होता त्यानंतर रविवारी पुन्हा एक गवा दिसल्याने शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे.
    आज सकाळी आठच्या सुमारास किणी गावालगत उत्तरपूर्व भागातील यादव टेकाजवळ ब्रिजेश यादव यांच्या शेतात अनेकांनी गव्यास पाहिले,मात्र नागरिकांच्या हालचालीमुळे त्या गव्याने दुसरीकडे धूम ठोकली, त्यानंतर हा गवा किरण पाटील यांच्या शेतातील रस्त्यावरून त्यांच्या जनावरांच्या गोठ्याकडे येताना दिसला अगदी शंभर फुटावरून त्यांच्या दिशेने चालत येणाऱ्या गव्याचे पाटील यांनी मोबाईल चित्रीकरण केले मात्र काही अंतरावर आलेल्या गव्याने त्यांच्या गोठ्याच्या दिशेने चाल करताना पाटील यांनी प्रसंगावधान राखत स्टीलची बादली गव्याला फेकून मारल्याने गवा पुन्हा नदीच्या दिशेने निघून गेला, काही युवकांनी त्याचा घुणकी गावच्या जॅकवेल पर्यंत पाठलाग केला त्यांनतर ते युवक परतले.
    घुणकी येथे मंगोबा दैवताच्या यात्रेदिवशीच गव्याने शेतात दोनवेळा दर्शन दिल्याने प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे.
    गावच्या उत्तरेकडील बाजूला कोंडार विभागात सकाळ दहाच्या सुमारास काही शेतकरी गवताची कापणी करीत असताना प्रशांत जाधव, कृष्णात सनदे, बी.के.मोहिते, प्रशांत रासकर यांना ऊस शेतीत जाताना दिसला. त्यानंतर अकराच्या सुमारास मंगोबा दैवताच्या मंदिराच्या मागील बाजूला
    मोहिते रस्त्यावरील रामचंद्र मोहिते यांच्या ऊसlशेतात आला असल्याची माहिती मिळताच युवकांचा तांडा तिकडे वळला. दिग्विजय मोहिते, विशांत मोहिते, महेश मोहिते, आकाश मोहिते, आदेश मोहिते, संभाजी मोहिते, शिवाजी पोवार यांच्यासह पंचवीस हून युवकांनी हुसकला पण बाळासाहेब हरी मोहिते यांच्या शेतात ठाण मांडून बसला. त्यामुळे रामचंद्र मोहिते व बाळासाहेब मोहिते यांच्या ऊस शेतीचे नुकसान झाले.
    दरम्यान वनविभागाचे कर्मचारी रेणुका नाईक, पुंडलिक खाडे यांनी पाहणी केली.