खोची येथील शितल बाबर यांचा पुणे ते अयोध्या सायकलने प्रवास
कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- खोची येथील शितल सुरेंद्र बाबर या ४२ वर्षीय तरुणाने दहा दिवसांत पुणे ते अयोध्या हे १५६३ किमी अंतर सायकलने प्रवास करून प्रभू रामचंद्राचे दर्शन घेतले. यानिमित्त त्यांचा खोची येथील सहकार समूहातील संस्था कर्मचाऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. शितल हा गुरुदेवदत्त पतसंस्थेत वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. त्याला सायकलिंगचा छंद आहे. शितलने २०१९ पासून ते आजपर्यंत २५ हजार किलोमीटर सायकलिंग केले आहे.
त्याचा खोची विकास सेवा संस्थेचे संचालक एम. बी. बंडगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुदेवदत्त पतसंस्थेचे सचिव शिराज शेख, धान्य विभागप्रमुख रामचंद्र जाधव, सेवा संस्थेचे सचिव तानाजी पाटील, भैरवनाथ दूध संस्थेचे सचिव सागर थोरवत, पत्रकार भानुदास गायकवाड, धनाजी पाटील, अनिल बाबर, अमित जांभळे, तानाजी थोरवत आदी उपस्थित होते.
रोजच्या जीवनशैलीमध्ये सायकलचा वापर वाढावा. त्याद्वारे आरोग्य रक्षण, इंधन बचत, प्रदुषणाला आळा बसावा, महानगरांमध्ये निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्येवर सायकल हा पर्याय आहे. तसेच पर्यावरणाचे रक्षण या मुख्य उद्दीष्टांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी इंडो अॅथलेटीक सोसायटीने, पुणे यांनी ही सायकलस्वारी आयोजित केली होती. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष गजानन खैरे, संस्थापक सदस्य अजित पाटील, गणेश भुजबळ, गिरीराज उम्रीकर, अजित गोरे, श्रीकांत चौधरी, रवींद्र पाटील, अविनाश चौगुले, प्रदीप टाके, भुपेंद्र डेरवणकर आदींनी परिश्रम घेतले.