खोची सरपंच पदि रोहिणी पाटील यांची निवड 

    खोची सरपंच पदि रोहिणी पाटील यांची निवड

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-खोची सरपंचपदी सत्ताधारी कै. ए. बी. पाटील प्रा. बी. के. चव्हाण अमरसिंह पाटील गटाच्या रोहिणी दादासो पाटील यांची निवड झाली. गुप्त मतदान प्रक्रियेमध्ये रोहिणी पाटील यांना सात मते मिळाली. तर विरोधी उमेदवार प्रमोद सूर्यवंशी यांना सहा मते मिळाली. सरपंच पदासाठी दोन अर्ज आल्याने गुप्त मतदान घेण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुंभोज मंडल अधिकारी अरुण शेट्टी होते. सहाय्यक म्हणून ग्रामपंचायत अधिकारी आर. एस. मगदूम, तलाठी प्रमोद पाटील यांनी सहकार्य केले.

    खोची ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी कै. ए. बी. पाटील प्रा. बी. के. चव्हाण – अमरसिंह पाटील गटाकडे सात तर विरोधी अजय पाटील – प्रमोद सूर्यवंशी गटाकडे सहा सदस्य असे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात काठावरचे बहुमत आहे. सत्ताधारी गटाच्या अंतर्गत समझोत्यानुसार सरपंच स्नेहा पाटील यांनी कार्यकाल संपल्यानंतर राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यवाहीनुसार सरपंच निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी सत्ताधारी गटाकडून भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील गटाच्या रोहिणी पाटील यांनी तर विरोधी गटाकडून प्रमोद सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केला होता. सरपंच निवडीसाठी उपसरपंच सुहास गुरव, माजी सरपंच अभिजीत चव्हाण, जगदीश पाटील, स्नेहा पाटील, प्रमोद गुरव, पुनम गुरव, तसेच विरोधी गटाचे प्रमोद सुर्यवंशी, राजकुमार पाटील, शोभाताई पाटील, वैशाली वाघ, प्रतिक्षा आडके, कमलढाले उपस्थित होते.

    नूतन सरपंच निवडीनंतर रोहिणी पाटील यांचा गटनेते वारणा दूध संघाचे संचालक दिपकराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, प्रा. बी. के. चव्हाण, वसंतराव गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडीनंतर समर्थक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत समोर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी जल्लोष केला.

    भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी २०२१-२०२६ खोची ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या कार्यकाळात रोहिणी पाटील यांना उपसरपंच व सरपंच अशी दोन्ही पदे मिळवून दिली त्यामुळे अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाचे कौतुक होत आहे.

    यावेळी शिवाजी पाटील, सयाजी पाटील, संभाजी पाटील, दिनकर पाटील, विवेक कुलकर्णी, सर्जेराव माने, अजित मडके, संदीप लाटवडे, धनाजी गुरव, मोहन पाटील, अमोल मगदूम, पोपट गुरव, शशिकांत मगदूम, वसंत मगदूम, संदीप मुसळे, दादासो पाटील, रमेश मगदूम, मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर गावातील प्रमुख मार्गावरून गुलालाच्या उधळणीत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.