कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसवर होणाऱ्या दगडफेकीमुळे कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्याच बंद करण्याचा निर्णय एस. टी महामंडळ कोल्हापूर विभागाने आज घेतला. दुपारपासून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसेस बंद केल्या . दिवसाकाठी कोल्हापूर ते बेळगाव या मार्गावर सुमारे २६ गाड्या धावत असतात.
कोल्हापूर ते बेळगाव मार्ग बंद केल्याने प्रवांशाचा खोळांबा झाला. त्यामुळे एसटीला अंदाजे चार ते पाच लाखाच्या महसुलाला फटका बसला.
बेळगाव शहरात शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या गाडीवरील फलकाला काळे फासल्याची घटना येथे समजली. त्यानंतर शिवसेनेही येथे आक्रमक पवित्रा घेतला. शुक्रवारी येथील मध्यवर्ती बसस्थानकावर कर्नाटकाच्या बसगाडीच्या फलकाला काळे फासत निषेध नोंदविला होता.
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात शनिवारी सकाळी ५ – ४५ मिनिटांनी सुटणारी एमएच १३ सीए ७३६८ क्रमांकाची एसटी कोल्हापूर-स्वारगेट मार्गासाठी फलाटवर उभी होती. या दरम्यान संशयित हलगीकर याने खिशातून आणलेली दगडे बसच्या पुढील काचेवर फेकली. त्यात एसटीचे २५ हजारांचे नुकसान झाले.
दगडफेक करणाऱ्या संशयिताला बसस्थानकातील चालक, वाहकांनी पकडून प्रथम डेपो मँनेजर यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर महामंडळाच्या प्रशासनाने शाहूपुरी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. तत्काळ पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानकात धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले आहे.