तालुक्यात अतिवृष्टी व महापूरानंतर आता ऊसावर लोकरी माव्याचा धोका 

    तालुक्यात अतिवृष्टी व महापूरानंतर आता ऊसावर लोकरी माव्याचा धोका

     

     

    कुंभोज/ प्रतिनिधी (विनोद शिंगे):-हातकणंगले तालुक्यात ऊस पिकाची जोमदार वाढ होती.पण जुलै अखेर झालेल्या अतिवृष्टीमुळे वारणा, नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या महापुराने नदीकाठच्या उसाचे प्रचंड नुकसान झाले .आता पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे ऊसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी ऊसाचे माव्यापासून नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. नदी काठचा ऊस महापुराने गेला. उन्हामुळे माळरानाला फटका बसला आणि आता लोकरो माव्याने डोकं वर काढल्याने शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. लोकरी माव्याचा वाढता प्रसार रोखण्यासाठी तालुका कृषी विभागाने अचूक मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

    वारणा नदीला बारमाही मुबलक पाणी उपलब्ध असल्याने बहुतांशी शेतकरी ऊसाचे पीक घेतात. यंदा उन्हाळ्यात वळीवाने ओढ दिली. तसेच सुरवातीला मान्सून पावसाने दमदार सुूरवात केली . ऊन व पाऊस वातावरण ऊस पिकासाठी पोषक ठरले .ऊस तजेलदार होऊन वाढ जोमदार झाली. ऊसामध्ये शर्करेचे प्रमाण वाढले. सद्या उष्ण दमट हवामानामुळे ऊसावर पांढऱ्या लोकरी माव्याचा प्रसार झपाट्याने वाढत आहे.लोकरी माव्याचे कीटक उसाच्या पानातील शर्करा शोषून घेतात.यामुळे उसाची वाढ खुंटते व नुकसान होऊन उत्पादन घटते.याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

    या लोकरी माव्यावर तातडीने प्रभावी उपाययोजना न झाल्यास येणार्‍या थंडीमुळे त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. कारण थंडीत या लोकरी मावा वाढीसाठी पोषक वातावरण असते. काही ठिकाणी फवारणी करूनही पूर्णपणे मावा नाहीसा झालेला नाही.

    या मावा किडीची पिले व प्रौढ कीड पानाखाली स्थिर राहून अणकुचीदार सोंडेच्या साहाय्याने पानातील अन्नरस शोषूण घेतात. त्यामुळे पानाच्या कडा सुकतात. हा मावा पानावर मधासारखा चिकट पदार्थ सोडतो. पानाच्या मागच्या बाजूस मध्य शिरेच्या दोन्ही बाजूंना दाटीवाटीने एकमेकांच्या अंगावर बाल्यावस्थेत पिले बसलेली दिसतात.

    कीडग्रस्त पानांवर पिवळसर ठिपके दिसतात. पहिल्या-दुसर्‍या अवस्थेत मावा पिलावर लोकर नसते. तिसर्‍या अवस्थेपासून लोकर येते. पानामधील रस शोषल्याने पाने निस्तेज होतात. या मावा किडीची विष्ठा चिकट असल्याने त्यावर काळी बुरशी वाढते. पानावर काळ्या रंगाच्या कॅप्नोडियम या बुरशीची वाढ झाल्यामुळे हे पान काळे पडते. त्यामुळे पानाची कर्बग्रहणाची प्रक्रिया मंदावते. पानांद्वारे प्रकाश संश्लेषण थांबते. त्यामुळे उत्पनाताही काही टक्के घट येते. तसेच, फवारणीसाठी महागडी औषधे वापरावी लागतात.