हातकणंगले तालुक्यात डेंग्यू रूग्ण संख्येत वाढ, आरोग्य विभागाच्यावतीने जनजागरण मोहिम सुरु

    हातकणंगले तालुक्यात डेंग्यू रूग्ण संख्येत वाढ, आरोग्य विभागाच्यावतीने जनजागरण मोहिम सुरु

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):हातकणगले तालुक्यात गेल्या दीड महिन्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रूग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने उपचाराबरोबरच जनजागरण मोहिम राबविण्यात येत आहे.मे महिन्यात ग्रामीण भागात आणि शहरी भागात रूग्ण आढळून आले होते. तर १९ जूनपर्यंत ग्रामीण भागात आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळले आहेत. अशा पध्दतीने जिल्ह्यात शेकडोंच्या घरात डेंग्युची लागण झाली होती. जिल्ह्याचा विचार करता डोंगराळ भागात या आजाराचे रूग्ण अजिबात नसून काही ठिकाणी अतिअल्प आहेत. मात्र करवीर आणि हातकणंगले या नागरीकरण झालेल्या परिसरातील गावात मात्र डेंग्युचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. या दोन तालुक्यांच्या खालोखाल पन्हाळा तालुक्यात डेंग्यूची लागण झाल्याचे दिसून येते.प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये जुनी भांडी, टायर, अडगळीच्या साधनांमध्ये पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्याचे आणि संबंधित ठिकाणी गप्पी मासे साेडण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना दिल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेश गायकवाड यांनी सांगितले.

    परिणामी सध्या ग्रामीण भागात डेंगूची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यावरती उपाययोजना करण्यासाठी आरोग्य केंद्र व पथकाच्या वतीने तसेच ग्रामपंचायत च्या वतीने सहकार्य केले जात आहे. कुंभोज ग्रामपंचायत च्या वतीने कुंभोज सह परिसरात मोठ्या प्रमाणात औषध फवारणी केली जात असून डेंगूंची रुग्णसंख्या किंवा डेंगूची लक्षणे आढळल्यास आरोग्य पथकाशी संपर्क साधण्याचे आव्हान ग्रामपंचायत कुंभोज यांनी केले आहे.