कोल्हापूर : जेष्ठ नागरिक व व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समन्वय अधिकारी नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले आहेत.
शाहूवाडी व चंदगड तालुक्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी महापालिका डॉ. कादंबरी बलकवडे, कागल व गडहिंग्लज तालुक्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, हातकणंगले व शिरोळ तालुक्यासाठी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, पन्हाळा, गगनबावडा व करवीर ग्रामीण साठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अजयकुमार माने, आजरा, भुदरगड व राधानगरी तालुक्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.पी.शिवदास यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
कोरोना विषाणू (कोविड-19) चा प्रार्दुभाव पुन्हा वाढत असल्याने नागरिकांच्यामध्ये कोव्हीड -19 संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे व प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून कोविड-19 लसीकरणाच्या माध्यमातून 60 वर्षावरील सर्व नागरिक व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिकांसाठी लस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कोव्हीड -19 नियंत्रणासाठी लसीकरण हाच प्रभावी व मुख्य उपाययोजना आहे. वय वर्षे 60 वरील व्यक्तींच्या तसेच 45 ते 60 या वयोगटातील सहव्याधी (Co – Morbid) असलेल्या व्यक्तींचे जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी लसीकरणाची गती वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. सर्व शासकीय रुग्णालयामध्ये स्थापन केलेल्या लसीकरण कक्षामार्फत लसीकरणाचा वेग वाढविणे, आवश्यक असल्यास उर्वरित शासकीय रुग्णांलय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे येथे कक्ष स्थापन करणे, तसेच जास्तीत खाजगी रुग्णालयांना लसीकरणाच्या कामामध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणे व आवश्यकतेप्रमाणे लसीकरणाची सुविधा 24 X 7 उपलब्ध होण्यासाठी उचित नियोजन करणे. त्याव्दारे जेष्ठ नागरिक व व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून कोव्हीड -19 विषाणू प्रादुर्भाव रोखणेच्या अनुषंगाने कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे. असेही आदेशात नमुद आहे.