घुणकी : येथील ग्रामदैवत मंगोबा दैवताची यात्रा१३ व १४ मार्चला होणारी रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सरपंच श्रीमती राजाक्का रासकर,उपसरपंच राजकुमार हराळे, ग्रामविकास अधिकारी अंकूश गोरे यांनी दिली.
घुणकी येथील १३ व १४ मार्चला यात्रा होणार असून प्रतिवर्षी कुस्त्यांच्या मैदानासह विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी यात्रेच्या
पार्श्वभूमीवर पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अध्यक्षतेखाली, ग्रामपंचायत पदाधिकारी,पुजारी, गावातील प्रमूख यांच्यात बैठक झाली.
अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यात्रा रद्द कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दिल्या आहेत. यात्रा म्हटले की गर्दी. म्हणून ही गर्दी टाळण्यासाठी १३ व १४ मार्चला परंपरेप्रमाणे धार्मिक विधी होतील. पाळणे, दुकानांना प्रवेश दिला जाणार नाही. कुस्त्यांचे मैदान, मनोरंजनाचे कार्यक्रम, शर्यती असे सर्वच कार्यक्रम रद्द करावेत. नागरीकांनी गर्दी टाळण्यासाठी पाहुण्यांना आमंत्रित करु नये. धार्मिक कार्यक्रमावेळी पोलीसांना उपस्थित ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस वारणेचे संचालक राजवर्धन मोहिते, सुभाष जाधव, राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्ष संभाजी पाटील, पोलीस पाटील संदीप तेली, रामकृष्ण संस्था समूहाचे अध्यक्ष अशोकराव जाधव, देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रभाकर कुरणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पुजारी,ग्रामस्थ उपस्थित होते.