वस्त्र संस्कृती विषयक कार्यशाळेचे आज इचलकरंजी येथे आयोजन
कोल्हापूर, (जिमाका)दि.21 :- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत इचलकरंजी येथे आज शनिवार दि 22 मार्चपासून वस्त्र संस्कृती विषयक दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे करण्यात आले आहे.
शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्राची पारंपारिक वस्त्र संस्कृती, कालानुक्रमे वस्त्र संस्कृतीमध्ये होत जाणारे बदल, वस्त्र संस्कृतीचे महत्त्व आणि वस्त्र संस्कृतीचे जतन आणि संवर्धन यावर विविध मान्यवरांची व्याख्याने, चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा संपन्न होत असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली .
शनिवारी सकाळी दहा वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन होईल. दि 22 मार्च रोजी प्राचीन शैली वस्त्र वारसा – विनय नारकर .डॉ. अश्विनी अनिल रायबागी यांचे भारतमाता व वस्त्रोद्योग यावर मार्गदर्शन होईल. श्रीमती भाग्यलक्ष्मी घारे हे कोकणातील काथ्या उद्योग यावर भाष्य करतील, तर श्री बाळकृष्ण कापसे हे पैठणी विणकाम आणि बदलते तंत्रज्ञान यावर बोलतील .श्रीमती केतकी शहा मुक्कीरवार यांचे खण वस्त्र परंपरा आणि त्यातील बदल यावर भाष्य करतील
रविवार 23 मार्च रोजी रसिका वाकलकर या ‘ पैठणी काल आज आणि उद्या ‘ यावर तर इम्रान कुरेशी हिमरु वस्त्र शैलीबाबत आपले विचार मांडतील. त्यानंतर चित्रपट क्षेत्रातील वेशभूषाकार चैत्राली डोंगरे यांचे चित्रपटसृष्टीतील ‘ वस्त्रभूषा ‘ यावर व्याख्यान होईल , प्राचार्य श्रीमती हिरेमठ या बदलती पिढी आणि फॅशन इन्स्टिट्यूट यावर आपले मनोगत व्यक्त करतील .माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांचे वस्त्रोद्योग योजना यावर तर श्रीमती पौर्णिमा शिरीषकर हे वस्त्रोद्योगातील संधी यावर मार्गदर्शन करतील. 22 मार्च रोजी सायंकाळी “गाणी वस्त्रांची” हा सांस्कृतिक कार्यक्रम जेष्ठ संगीतकार अजित परब आणि त्यांचा समूह सादर करणार असून 23 मार्च रोजी पारंपारिक वस्त्रांचा फॅशन शोचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत विद्यार्थी, अभ्यासक, पत्रकार व रसिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केलेआहे.