डी.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पसकडून इलेक्ट्रिकल पोल होल्डरची निर्मिती
पहिलाच कमर्शियल प्रॉडक्ट, अनुश्री आमले हिचे संशोधन लाईनमनचे काम होणार सोपे
तळसंदे,(प्रतिनिधी):- डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदेच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल अंतर्गत स्टार्टअपला चालना देत बिजनेस आयडिया कमर्शियल करण्यात यश आले आहे. महाविद्यालयची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी अनुश्री आमले हीने संशोधित केलेल्या इलेक्ट्रिकल पोल होल्डरची निर्मिती केली आहे. या उपकरणामुळे लाईनमन व तंत्रज्ञ यांना इलेक्ट्रिकल पोल वरती काम करण्यासाठी चढ-उतार करणे सोपे झाले आहे.
विद्यार्थ्यांना रिसर्च आणि इनोवेशनला चालना देऊन स्टार्टअपसाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये स्वतंत्र सेलची उभारणी करण्यात आली आहे. प्रा. आरिफ ए शेख यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या विभागात विविध संशोधन प्रकल्पांवर काम सुरु आहे. या विभागाने आता पुढील पाउल टाकत विद्यार्थ्यांच्या कल्पना कमर्शियल करण्याच्या दृष्टीने भक्कम पाउल टाकले आहे.
आपल्या विद्युत कर्मचाऱ्यांना विशेषत: लाईनमन आणि तंत्रज्ञ यांना इलेक्ट्रिक पोलवर काम करण्यासाठी चढ- उतार करावयास लागतो. हे करताना खूप शारीरिक ऊर्जा खर्च होते. हि समस्या लक्षात घेऊन इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटची विद्यार्थिनी अनुश्री आमले हिने प्रा. आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरु केले. सुमारे वर्षभराच्या संशोधनातून इलेक्ट्रिकल पोल होल्डर तयार करण्यात तिला यश आले. या उपकरणासाठी भारत सरकारकडून त्यान पेटंटही मंजूर झाले आहे. त्यानंतर रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागाच्या मदतीने हे उपकरण मार्केटमध्ये आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोन प्रकारात हे उपकरण उपलब्ध करण्यात आले आहे.
या उपकरणाचा इलेक्ट्रिकल विभागातील लाईनमन तसेच तंत्रज्ञ यांना चांगला फायदा होईल. पोलवर चढ-उतार करणे सहज सोपे व्हावे अशी त्याची रचना करण्यात आली आहे. बुटाप्रमाणे या उपकरणाचा वापर करता येत असून वापरण्यास अतिशय सोपे आहे. या माध्यमातून विद्यार्थ्याच्या आयडीयांचे कमर्शलायझेशन करून स्टार्टअपच्या माध्यमातून भावी उद्योजक घडविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे, प्रा. आरिफ शेख यांनी सांगितले.
या संशोधनाबद्दल अनुश्री आमले हिचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील, विश्वस्त मा. आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता, कॅम्पस डायरेक्टर एस आर पावसकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.