राजू शेट्टी संपलाय या शब्दांनी संघर्षाच्या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात होतीय…
कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-रात्रभर ऊसाला पाणी पाजायचं.. दिवसभर जनावरांची उसाभर करायची…संध्याकाळी दुधाची किटली डेअरीत ओतायची..आणि चौकातल्या कट्ट्यावर बसून दिवसभराच्या कष्टाचा हिशोब उसासा टाकत लावायचा. हा शेतकऱ्याच्या दिनक्रम. अशा शेतक-याच्या कानांवर आज-काल काही तरुणांची केविलवाणी किलबिल ऐकू येते. “अरे आता काय ? राजू शेट्टी संपलाय”. अर्थात राजू शेट्टीचं राजकारण संपलंय कष्टक-यांना हवाहवासा वाटणा-या राजू शेट्टीची ताकद कमी झाली या भावनेने गावागावात, चौकाचौकात विविध पक्षांचे कार्यकर्ते उसासा टाकताना दिसतात. गेल्या तीस वर्षांपासून याच राजू शेट्टीने या चौकातल्या तरुणांच्या नेत्याला सळो की पळो करून ठेवलयं …त्यांच्या कार्यकर्त्यांना समाधान वाटत असलं तरी…
त्या कट्ट्यावर बसणाऱ्या शेतकऱ्यालाच माहीत की त्याच्यासाठी राजू शेट्टी चालला पाहिजे की संपला पाहिजे..
“अरे हा राजू शेट्टी संपलाय”..हे शब्द पहिल्यांदा कानावर पडत नाहीयेत. हे शब्द पहिल्यांदा कानावर पडले होते 25 वर्षांपूर्वी… कारखानदारांच्या बगलबच्चांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्या मारहाणीत ” अरे..राजू शेट्टी संपलाय..”असं म्हणत त्याला नदीत फेकून द्यायला निघाले होते… त्यावेळी काही शेतकऱ्यांनी ती वेळ येऊ दिली नाही. शेतकऱ्यांना बघून ते बगल बच्चे पळून गेले. शेतकऱ्यांनीच त्याला दवाखान्यात दाखल केलं…आणि जखमी अवस्थेतच या कारखानदारां विरोधात या राजू शेट्टीनं संघर्ष केला होता. त्यानंतर ही चळवळ महाराष्ट्रभर पसरली आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन न्याय मिळवला..राजू शेट्टी काय तुमच्या नेत्याला पाडण्यासाठी किंवा स्वतःची आर्थिक उन्नती करण्यासाठी निवडणूक लढवत नाही..राजू शेट्टी कष्टक-याच्या, शेतकऱ्याच्या घामाला दाम मिळवून देणारी चळवळ बळकट करण्यासाठी निवडणूक लढवतो. शेतकऱ्यांशी एकनिष्ठ राहणं हा त्याचा धर्म आहे. तो कुठल्याही पराभवाने किंवा विजयाने विचलित होणार नाही..
‘राजू शेट्टी संपलाय’ या शब्दांनी संघर्षाच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात झाली होती. आज परत या शब्दांपासून संघर्षाच्या दुस-या अध्यायाची सुरुवात झाल्यास नवल वाटू नये…
– पै. प्रकाश गावडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना