डी.वाय.पाटील कृषी महाविद्यालयाच्या पल्लवी साबळेची युपीएससीद्वारे अधिकारीपदी निवड
तळसंदे,(प्रतिनिधी):- डॉ.डी.वाय.पाटील कृषी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी पल्लवी साबळे हिची संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात आलेल्या ईपीएफओ परीक्षेतून एन्फोर्समेंट अधिकारी पदी निवड झाली.
मूळची अहमदनगर जिल्ह्यातील असलेल्या पल्लवीने सन २०१७ ते २०२१ या कालावधी मध्ये डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात कृषी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठी अधिकारी बनून लोकसेवा करण्याचे तिचे स्वप्न होते. त्यानुसार तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करून या परीक्षेत यश मिळवले आहे. पल्लवीने मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल प्राचार्य डी. एन. शेलार यांनी अभिनंदन केले आहे.
महाविद्यालयात सुरुवातीपासूनच विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविले जाणारे विविध उपक्रम, महाविद्यालयातील प्राध्यापक व माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन तसेच आई वडिलांचे पाठबळ या मुळे यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळाल्याचे पल्लवी ने सांगितले. या कृषी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन प्रशासकीय सेवेमध्ये उत्तम रीत्या जबाबदारी सांभाळत आहेत.
पल्लवीच्या या यशाने महाविद्यालयाचा शैक्षणिक आलेख आणखीन उंचावला आहे तसेच पल्लवी व माजी विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेमध्ये मिळवलेले यश सर्वच विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल असा विश्वास प्राचार्य डी. एन. शेलार यांनी व्यक्त केला.
पल्लवीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी.पाटील,विश्वस्त मा. आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील व कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.