खोचीत भैरवनाथ देवाचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा
खोची,(भक्ती गायकवाड):- महाराष्ट्र-कर्नाटकातील भाविकांचे आराध्यदैवत,जागृत देवस्थान व खोची ता.हातकणंगले ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री.भैरवनाथ देवाचा जन्मोत्सव सोहळा शनिवारी रात्री मोठ्या उत्साहात,हजारो भाविकांच्या उपस्थितीत,गुलाबी थंडीत मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी शोभेच्या दारूची नयनरम्य प्रचंड अतिषबाजी करण्यात आली.रात्री सव्वा बारा वाजता नाथबुवा यांच्या मंत्रोच्चारानंतर फुले टाकणे(पुष्पवृष्टी) जन्मोत्सव सोहळा,सुटंवडा वाटप,नामकरण विधी,पाळणा कार्यक्रम झाले.
जन्मोत्सवानिमित्त भैरवनाथ यांची काळभैरव रूपातील श्री काळभैरव शिव उपासना करीत बसलेली पूजा बांधलेली होती.तर जोगेश्वरीची सदर बैठी रूपातील भव्य व आकर्षक पूजा बांधण्यात आली होती.संयोजन
देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र,कोल्हापूर यांच्या अधिपत्याखालील श्री.भैरव देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती,खोची, सालकरी पुजारी,ग्रामस्थ व गुरव,गोसावी,नाथ समाज, गावातील तरुण मंडळे यांनी केले.
जन्मोत्सव सोहळ्यास भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.महिलावर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.रात्री मंदिर परिसरात वाहने लावण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. गावात वाहने लावण्यात आली.एवढी गर्दी झाली होती.तसेच दिवसभर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती.जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंदिर प्रांगणात भव्य मंडप घालण्यात आला होता.तसेच मंदिर व परिसरात भव्य विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करून भव्य रांगोळी काढण्यात आल्या होत्या.
त्यानिमित्त श्री.भैरवनाथ जोगेश्वरी ग्रंथाचे पारायण,कालभैरव अष्टक पठण,महाप्रसाद,श्री ची आरती,सचिन लोहार,सावर्डे ता.कागल प्रेझेंटस् आधुनिक संगीत भजनाचा कार्यक्रम,विठ्ठल भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम.पहाटे भाविक जोशी यांच्या मंत्रोच्चार पठणात महाभिषेक,महापूजा,रविवारी सकाळी आरती आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी आयोजित महाप्रसादाचा लाभ ग्रामस्थासह परगावच्या भाविकांनी मोठ्या प्रमाणात घेतला.या जन्मोत्सव सोहळ्यासाठी दत्त डेकोरेशन,आंबेवाडी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.