नवे पारगावात विज पडून तरूणाचा मृत्यू , खून झाला असल्याची दिवसभर चर्चा 

    नवे पारगावात विज पडून तरूणाचा मृत्यू , खून झाला असल्याची दिवसभर चर्चा

     

     

     

    पेठ वडगाव, (प्रतिनिधी) : वाठार-कोडोली मार्गावर नवे पारगाव (ता.हातकणंगले) हद्दीत शिकलगार फर्निचर जवळील भोंड्या माळावर नितीन मानसिंग भोसले (वय ३०)रा.फडनाईक कॉलनी,वारणानगर, मुळगाव मोहरे,(ता. पन्हाळा) या तरूणाचा मृतदेह मंगळवारी सकाळी १० वाजता निदर्शनास आला. सुरवातीला त्याचा खून झाला असल्याची परिसरात चर्चा सुरु होती मात्र त्या तरूणाचा विज पडून नैसर्गिक मृत्यू झाल्याचे शवविच्छेन केल्यावर समजले.

    सदर घटनेची नोंद पेठ वडगांव पोलीसात झाली आहे. याबाबत पोलीसांकडून व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी,नितीन मानसिंग भोसले हा मोहरे (ता.मोहरे) येथील रहिवासी आहे . काल सकाळी नवे पारगाव येथे त्याचा हिरो होंडा पॅशनप्रो मोटरसायकल (क्र. MH09-CP8763 ) व मृतदेह घटनास्थळी मिळून आला.प्रथम दर्शनी त्याचा कोणी तरी खून केला असावा,अशी शंका आल्याने वडगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी समांतर तपास करणेस सुरुवात केली. तपासादरम्यान काही इसमांना ताब्यात देखील घेण्यात आलं.दरम्यान, मयत नितीन भोसले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.डॉ.श्रीमती अश्वत्थी गावडे यांनी शवविच्छेदन केले असता मयत नितीनच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले.मयत नितीनच्या अंगावर भाजल्याच्या तसेच फुफ्फुस देखील जळाल्याचे शवविच्छेदनातून दिसून आले आहे.त्यामुळे नितीनचा कोणीही खून केला नसून त्याच्या अंगावर वीज पडून त्याचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचे पोलीसानी सांगितले.

    नितीन व त्याचे वडिल निवृत्त जवान असून सध्या तो कुटूंबासह वारणानगर येथे वास्तव्यास होते.नितीन हा सोमवारी (ता.30) रात्री 09 च्या दरम्यान बाहेर जेवण करणेस जात असल्याचे सांगून तो बाहेर पडला. दरम्यान रात्री  10:30 पासून त्याचा मोबाईल बंद झाला. घरच्यांकडून मोबाइलवरुन शोध घेण्याचा प्रयत्न झाला. मंगळवारी सकाळी 09:45 च्या सुमारास शिकलगारच्या फर्निचर मॉलच्या बाजुच्या माळरानावर नितीनचा मृतदेह निदर्शनास आला. पोलीस पाटील इंद्रजीत पाटील यानी वर्दी दिली. नितीनच्या मृतदेहातील उजवा पाय मोटरसायकलखाली व डावा पाय मोटरसायकलवर होता. समोरील अंगावरचे कपडे फाटले असून छातीचे बाजुस,हातावर जखमा दिसत होत्या. पण शवविच्छेदनानंतर विज पडून नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सिध्द झाले.

    दरम्यान दिवसभरात फाॅरेनसिकचे सुदर्शन यांच्यासह त्यांचे पथक, एलसीबी चे पोलीस निरीक्षक कळमकर व पथक,जयसिंपूर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.रोहिणी सोळंकी, वडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले,उपनिरीक्षक भरत पाटील, लक्ष्मण सरगर, खलील इनामदार यांच्यासह पोलीस ताफा तपासासाठी थांबून होते. शवविच्छेदनापर्यंत खून असल्याची चर्चा असल्याने त्याप्रमाणे तपास झाला.

    नितीन हा अमृतनगर येथील वॅप्कॉस मध्ये सिव्हील विभागातील अभियंता होता.

    त्याचे पश्चात आई, वडिल,बहिण,पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

    याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रोहिनी सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास भोसले करत आहेत.