पाडळीच्या सरपंचपदी पुन्हा डॉ.विभावरी पाटील

    पाडळीच्या सरपंचपदी पुन्हा डॉ.विभावरी पाटील

     

    नवे पारगाव : पाडळी,(ता.हातकणंगले) येथील अनेक नाट्यमय घडामोडीनंतर सरपंचपदाची माळ पुन्हा एकदा डॉ. विभा पाटील यांच्या गळ्यात पडली.

    २०२१ घ्या निवडणुकीत येथील ग्रामपंचायतीवर सर्व ११ सदस्य जनसुराज्य शक्ती पक्षाचे निवडून आणले होते. येथील सरपंचपद सर्वसाधारण महिला पदासाठी राखीव असल्याने प्रथम डॉ. विभावरी पाटील यांना सरपंचपदाची संधी मिळाली. अडीच वर्षांनंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला. व यानंतर याच पक्षातील ऐश्वर्या पाटील व सुजाता पाटील या दोघी सरपंच पदासाठी इच्छुक होत्या. परंतु पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला. जनसुराज्य नेते व कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने व पक्षप्रमुख विनय कोरे यांच्यापर्यंत पोहचला. राजकीय चर्चा होऊन ऐश्वर्या पाटील ह्या बिनविरोध सरपंच झाल्या. जनसुराज्य पक्षाच्या नेते मंडळींनी यानंतर सुजाता पाटील यांना सरपंच करण्याचा शब्द दिला होता. पण गेल्या सहा महिन्यात गावातील काही राजकीय घडामोडी घडल्याने स्थानिक नेत्यांनी सुजाता पाटील यांना सरपंचपद देण्यास विरोध केला.

    अखेरच्या क्षणी स्थानिक नेत्यांनी डॉ. विभावरी पाटील, यांचा अर्ज भरला. यावेळी विभा पाटलांना पाच मते तर विरोधातील सुजाता पाटील यांना तीन मते तीन सदस्य अनुपस्थित राहिल्याने विभा पाटील यांना सरपंच म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे पाडळीच्या सरपंचपदाची निवड परिसरात चर्चेचा विषय बनली.