चांदोली धरणाच्या विसर्गात मोठी कपात,8092 क्युसेक विसर्ग : वारणा नदीकाठच्या गावांना दिलासा
कुंभोझ / प्रतिनिधी (विनोद शिंगे):-वारणा नदीचा जलसाठा असलेल्या वसंत सागर या चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टीचा जोर ओसरला असून धरणातून 16976 क्यूसेकने नदीपात्रात सुरू केलेला विसर्गात सोमवारी 4691 क्युसेक तर मंगळवार सकाळ पासून 4599 अशी एकूण 8884 क्यूसेक अशी
मोठी कपात केल्याने नदीकाठच्या गांवाना दिलासा मिळाला आहे. सद्या धरणातून 8092 क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा कमी होत चालला असल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर कायम राहून आजवर 2527 मि. मी पाऊस पडला आहे.शनिवार पासून काही अंशी पाऊस उघडला असलातरी धरण क्षेत्रात मंगळवार दुपारी 4 वा.पर्यन्त देखील 93 मि.मी पाऊसाची नोंद झाली आहे.
चांदोली धरणातून नदी पात्रात मंगळवार दि.23 पासून सुरू केलेल्या विसर्गात टप्या टप्याने वाढ करून सोमवार दि.29 सकाळ पर्यंन्त 16976 क्यूसेक विसर्ग सुरू होता या विसर्गाने धरणातील पाणी साठा चार दिवसात 4 टिएमसी ने कमी झाला आहे.
चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता 34.40 टीएमसी असून पाणी साठा 29.13 टीएमसी होऊन धरण 84.37 टक्के भरले आहे. जलाशय परिचालन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग चालू झाल्याने नदीकाठच्या दोन्ही बाजूची हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे.सद्या नदीपात्रात वीजनिर्मिती साठी 1470 व वक्र द्वारातून 6622 क्युसेक असा 8092 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
वारणा नदीच्या पाणीपातळी कमी होत चालली आहे पात्राबाहेर गेलेले
पाणी ओसरू लागले आहे. नदीने इशारा पातळी ओलांडल्यानंतर नदीकाठची हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली होती. दरम्यान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी जास्त होईल त्यादृष्टीने धरणातील विसर्ग राखला जातो असे पाटबंधारे कोडोली उपविभागाचे सहा. अभियंता मिलींद किटवाडकर यांनी सांगितले.