कुंभोज रयत शिक्षण संस्थे समोरील रस्ता करण्यात लोकप्रतिनिधींना अपयश, केवळ आश्वासनांची खैरात
हातकणंगले, प्रतिनिधी (विनोद शिंगे) :- सन 2021 पासून हातकणंगले विद्यमान आमदार,माजी आमदार, विद्यमान खासदार, तसेच हातकणंगले तालुक्यातील अनेक शासकीय व राजकीय व्यक्तींनी कर्मवीर अण्णांचे स्मारक जन्मभूमी तसेच कोरोना सेंटर, विद्यार्थी परिषद, जिल्हा विज्ञान प्रदर्शन अशा तीन मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावली आणि स्टेजवरून शाळेकडे येणारा हा रस्ता आपण तात्काळ दुरुस्त करुन देऊ असे “रेकॉर्डेड” आश्वासन दिले.
सदर आश्वासनावेळी कुंभोजचे जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे तसेच गावातील लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते. प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित लावायची व आश्वासन देऊन जायचे हा आता कायमचाच खेळखंडोबा झाला आहे.गेल्या तीन वर्षात बीएसएनएल ऑफिस ते रयत गुरुकुल पब्लिक स्कूल, कुंभोज हा निव्वळ दोनशे मीटर रस्ता राजकीय व शासकीय प्रतिनिधींना करता येत नसेल तर हे अपयश गावाचे की लोकप्रतिनिधींचे ? रस्त्याची अक्षरशः चाळण झालीय. चिखलगुट्टा शर्यत लावता येईल अशी दुरावस्था झालीय. या शाळेत पंधरा गावातून तब्बल ५०० विद्यार्थी येतात. दुर्दैवाने, पावसाळ्यात या रस्त्याने येणारे विद्यार्थी, पालक अथवा शिक्षकांचा अपघात झाल्यास याची जबाबदारी कुणाची?
कुंभोजचे लोकप्रतिनिधी की विद्यमान आमदार? यांची असा सवाल पालक वर्गातून सध्या उपस्थित होत असून इतर ठिकाणी कोठावधी रुपयाचा फंड लावणारे लोकप्रतिनिधी शाळेच्या बाबतीत मात्र मूग गिळून गप का अशी चर्चा सर्व सामान्य नागरिकांत सध्या जोर धरत आहे.
गेल्या तीन वर्षात अनेक वेळा आश्वासनांची खैरात झाली परंतु त्याची पूर्तता मात्र झाली नाही, ती पूर्तता ती कधी होणार विद्यार्थ्यांना शाळेला जाण्याचा मार्ग कधी सुखकर होणार .असे वेगवेगळे प्रश्न सध्या विद्यार्थी व पालक वर्गातून जोर धरत आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असून येणाऱ्या काही दिवसात हा रस्ता पूर्ण न झाल्यास नंतर विधानसभेच्या आचारसंहितेची कारणे सांगितली जाणार आहेत याचीही पालक वर्गात चर्चा होत आहे.