शहरी भागात टोमॅटो दोनशे रुपये किलो तर ग्रामीण भागात शंभर रुपये किलोचा भाव
कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):- गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या मुंबईत टोमॅटोचे दर प्रतिकिलोमागे 200 रुपये इतके झाले आहेत. तर ग्रामीण भागात सध्या टोमॅटो ने ₹100 किलोचा भाव घेतला आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात टोमॅटोवर रोगराई पसरत असून शेतकरी सध्या टोमॅटो पिकावर औषध फवारणी करून तो वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य नागरिकांना टोमॅटोचा वाढता दर दिसत असला तरी टोमॅटो वरती फवारणी करण्यात येणारी औषधी व खतांचे दर ही दुप्पट वाढले आहेत. परिणामी शेतकऱ्यांच पदरात काय पडते हा सध्या संशोधनाचा विषय बनत आहे. वाढत्या दरामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. याचा फटका विक्रेतांना बसत असून, अनेक दुकानं बंद करावी लागत आहे.
पिकांची कमतरता आणि पावसामुळे होणारी नासाडी यामुळे जूनपासून जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. मे महिन्यात नियमित 30 रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो 13 जूनला दुप्पट होऊन 50-60 रुपये झाला. त्यानंतर 27 जूनला 100 रुपयांचा टप्पा पार केला आणि 3 जुलैला 160 रुपयांचा नवा विक्रम केला. खार मार्केट, पाली मार्केट वांद्रे, दादर मार्केट, माटुंगा, चार बंगले अंधेरी, मालाड, परळ, घाटकोपर आणि भायखळा येथील विक्रेत्यांनी 200 रुपयांची विक्री केली आहे.
मागणी अधिक, पुरवठा घटला
महाराष्ट्रातून टोमॅटोचा पुरवठा देशभरात केला जातो. व्यापाऱ्यांच्या मते, बाजारात टोमॅटोचा तुटवडा आहे. टोमॅटोची आवक घटली आहे. माल कमी येत आहे. मागणी जास्त असून आवक कमी आहे. तो अवघ्या 20 टक्क्यांवर आला आहे. तर काही ठिकाणी काळाबाजार होत असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे. पण भाव केवळ मेट्रो शहरातच वाढले आहेत, असे नाही. निम शहरात, तालुक्याच्या पातळीवर आणि खेड्यातील बाजारात पण टोमॅटोचे भाव वाढले आहेत.