इचलकरंजी;पंचगंगा पाणी पातळी 59 फुटावर,लहान पुल वाहतुकीसाठी तिसऱ्यांदा बंद
कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे)- इचलकरंजी शहरात काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून शहर परिसरात पुन्हा दमदार हजेरी लावली. त्यामुळे पंचगंगा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने इचलकरंजीतील पंचगंगा नदीचा जुना पूल तिसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद केला आहे. इचलकरंजीतील पाणी हळूहळू पात्राबाहेर जात आहे. काल रात्री पासून 3 फुटांनी पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून सध्या 59 फुटांवर आहे. रेणुका मंदिर परिसर, पंचगंगा स्मशानभूमी या परिसरात पानी आले आहे. त्याचबरोबर शहरातील पंचगंगेची इशारा पातळी ६८ फूट, तर धोका पातळी ७१ फूट आहे. महापालिका प्रशासनाने पुन्हा पंचगंगा नदीवर पाहणी सुरू केली आहे. वाहतुकीस धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने लहान पूल वाहतुकीस बंद केला आहे. दोन दिवसांत वाढलेल्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा पुराची भीती निर्माण झाली आहे. सध्या मोठ्या पुलावरून दोन्हीकडील वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पावसाचा जोर
वाढल्यास हुपरी रेंदाळ मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या आदेशानुसार पंचगंगा नदीघाटावर इचलकरंजी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे अधिकारी व सर्व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.विनोद शिंगे कुंभोज