हिंगणगाव मध्ये शरद कृषी कल्याण कडून एकात्मिक सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर गटचर्चा”
कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी अंतर्गत असणाऱ्या शरद कृषी महाविद्यालय,जैनापूर येथील ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत हिंगणगाव येथे कृषी कन्या मृण्मयी धनगर,काजल डोंबाळे, अर्पिता कोरे,स्नेहल पाटील व साक्षी वर्णे यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी गटचर्चा आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
पिकाच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात लागणारी नत्र,स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांच्या पुरवठ्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते.मात्र,अत्यंत कमी प्रमाणात लागणाऱ्या इतर मूलद्रव्यांविषयी शेतकऱ्यांमध्ये फारशी जागृती नाही.त्यांची आवश्यकता प्रमाणामध्ये अत्यल्प असली तरी एकूण जीवनक्रमाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये महत्त्वाचे असतात.लोह,जस्त,तांबे,बोरॉन, मॅंगनीज,मॉलिब्डेनम,क्लोरीन आणि निकेल अशी आठ मूलद्रव्य आहेत. प्रमुख अन्नद्रव्यांच्या तुलनेमध्ये त्यांची आवश्यकता कमी असल्याने त्यांना सूक्ष्म अन्नद्रव्य असे म्हणतात. सर्वसाधारणपणे सूक्ष्मद्रव्यांची जमिनीतील उपलब्धता ही जमिनीचा सामू,क्षारता,मुक्त चुनखडीचे प्रमाण, पाण्याच्या निचऱ्याची स्थिती, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, जमिनीमध्ये राबवली जाणारी पीक पद्धती व जमिनीचा प्रकार अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. याविषयी कृषी कन्यांनी माहिती दिली.
यासाठी शरद कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या एस.आर. कोळी, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन एस.एच.फलके, कार्यक्रम समन्वयक डॉक्टर आर.टी. कोळी तसेच मृदा शास्त्र विषयाचे प्रा ए.एम.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.