Home कोल्हापूर जिल्हा कुंभोज बाजारातील खराब रस्तं, अर्धवट कामामुळे व्यापारी त्रस्त

कुंभोज बाजारातील खराब रस्तं, अर्धवट कामामुळे व्यापारी त्रस्त

कुंभोज बाजारातील खराब रस्तं, अर्धवट कामामुळे व्यापारी त्रस्त

 

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कुंभोज तालुका हातकणंगले येथील आठवडी बाजारातील महादेव मंदिर ते दिपक चौक पर्यंतच्या रस्त्यावर परंतु उखडलेल्या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. या ठिकाणी कचरा, चिखल आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहक, व्यापाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कुंभोज ग्रामपंचायतीने अनेक वेळा हाजारो रुपये खर्च करून बाजारात अनेक ठिकाणी रस्त्यांचे नुतनीकरण केले होते. परंतु या रस्त्यावर पुन्हा अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामे झाली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. तसेच बाजारात जागोजागी राडारोडा पडलेला आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज खचलेले आहेत. त्यामुळे अपघाताची देखील शक्यता आहे.

मागील चार महिन्यांपासून या खराब रस्त्याची परिस्थिती जैसे थे आहे. तसेच इतक्या छोट्या कामाला चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी निघून गेला तरी ग्रामपंचायत कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इथे आल्यानंतर मार्केट मध्ये आलो की चिखल यार्डात आलो असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नसल्याचे एका ज्येष्ठ व्यापाऱ्याने सांगितले.

कचरा आणि दुर्गंधीचा त्रास–

बाजारातील सर्व व्यापाऱ्यांना परिपत्रक काढुन ओला-सुक्या कचऱ्यासाठी बकेट ठेवण्याचे अनिवार्य करणे गरजेचेआहे. परंतु व्यापारी ग्रामपंचायत आदेशाला केराची टोपली दाखवतात बाजारात कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने व्यापारी मिळेल तिथे कचरा टाकत आहेत. त्यामुळे सगळीकडे अस्वच्छता पसरत आहे. तसेच कचऱ्यात जनावरे, डुकरे फिरताना दिसत आहेत. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहक, व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. तसेच बाजारपेठेत राहणाऱ्या अनेक नागरिकांना आठवड्यातील बुधवार व रविवारच्या बाजारानंतर दुर्गंधीच्या साम्राज्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर बाजारपेठेत रोगराई पसरत असून व्यापारी वर्गाबरोबर नागरिकांनीही सदर ठिकाणची स्वच्छता ठेवणे गरजेचे असल्याचे मत बोलले जात आहे.

परिणामी कुंभोज बाजारपेठेत पडलेले खड्डे ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींनी योग्य वेळी लक्ष घालून मुजवणे गरजेचे असताना याकडे ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का आहे असा संतप्त सवाल व्यापारी वर्गातून होत असून, ग्रामपंचायत आठवड्याला बाजारचा महसूल गोळा करते त्या महसुलातून सध्या रस्ता करण्यात यावा अशी मागणी ही नागरिकांच्यातून सध्या जोर धरत आहे.