भरधाव ट्रकच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू
खोची,(वार्ताहर):-भेंडवडे येथे सिमेंटच्या पाईप घेऊन जात असलेल्या भरधाव ट्रकने मोटार सायकलला जोराची धडक दिल्याने खोची ता.हातकणंगले येथील नानिवळे धरणग्रस्त वसाहत येथील आदित्य संभाजी जाधव (वय २२) या मोटरसायकलीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची आई सारिका संभाजी जाधव (वय ४२) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघाताची नोंद पेठ वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
मयत आदित्य जाधव व त्याची आई सारिका जाधव हे दुचाकी (M.H.09 BU 4430) वरून भेंडवडे येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आले होते.उपचार घेऊन परतत असताना भेंडवडे ता.हातकणंगले येथील बस थांबा परिसरात असलेल्या गणपती मंदिर शेजारी सांगलीहून सिमेंटच्या पाईप घेऊन कोतोलीकडे चाललेल्या ट्रक (M.H.06 CA 094) ची समोरून धडक बसली. यावेळी ट्रकने दुचाकीला तीस फुटाहून अधिक अंतर फरफटत नेल्याने दुचाकीची पेट्रोल टाकी फुटून गाडीला आग लागली.यावेळी जवळ असणाऱ्या तरुणांनी प्रसंगावधान राखून दुचाकी ट्रक खालून बाहेर काढली व आग विझवली मात्र आदित्य जाधव व सारिका जाधव या दुचाकी गाडीसह ट्रकच्या खाली सापडल्याने आदित्यचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची आई सारिका जाधव गंभीर जखमी झाल्या असून यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले.ट्रक चालकाला पेठ वडगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
या अपघाताचा पंचनामा वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल जावेद रोटीवाले, अमन मुजावर, माधुरी वडिंगेकर,पोपट माने यांनी केला.अपघात मेन रस्त्यावर झाल्याने खोची,भेंडवडे,नानिवळे वसाहत परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.सायंकाळी सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.त्यानंतर मुतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात आई-वडील,लहान भाऊ,आजी आजोबा असा परिवार असून रक्षाविसर्जन शनिवारी सकाळी आहे.
— 🔲–
आजारी आईला मुलगा दवाखान्यात उपचार करून घेऊन घरी परत येताना हा अपघात झाला.व आईच्या डोळ्यादेखत आपल्या तरुण मुलाचा जीव गेल्याने घटनास्थळी हळहळ व्यक्त होत होती.