मॅग्नेट प्रकल्प फुलशेतीस वरदान- अनुप कुमार अप्पर मुख्य सचिव सहकार व पणन
कोल्हापूर :- आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्री बिजनेस नेटवर्क (मॅग्नेट )प्रकल्पांतर्गत के.एफ.बायोप्लांट व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 16 मे 2024 रोजी फुले पिक उत्पादने व सुगी पश्चात संबंधित कार्यशाळेचे दिपप्रजव्वलन करुन उद्घाटन सकाळी 11.00 वाजता राज्याचे मुख्य सचिव मा. श्री अनुप कुमार (सहकार व पणन) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर उद्घाटन प्रसंगी मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक श्री विनायक कोकरे, पुणे जिल्हा पीडीसी बँकेचे संचालक श्री.माऊली दाभाडे, मॅग्नेट प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव, राष्ट्रीय सुगी तंत्रज्ञान संस्थेचे संचालक, डॉ. सुभाष घुले, उपसंचालक श्री राजेंद्र महाजन, के.एफ बायोप्लांट चे सरव्यवस्थापक श्री आशिष फडके, आयसीएआर चे शास्त्रज्ञ, डॉ.गणेश कदम .गणेश खिंड कृषी केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मोहन शेटे डॉ.विष्णु गरांडे, इंडिका फ्रेशचे श्री पंडित शिकारे, मॅग्नेट प्रकल्पाचे श्री कैलास कुंभार, श्री नितीन पाटील, श्री.चेतन भक्कड व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञानाचे अधिकारी व कर्मचारी व राज्यातील 168 फुल उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरुवातीस कृषी विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी कै.डॉ. गोविंद हांडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .सदर कार्यशाळेसाठी तयार करण्यात आलेल्या “फुल पीक माहिती पुस्तिकेचे” विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना, श्री विनायक कोकरे यांनी मॅग्नेट प्रकल्प बाबतची विस्तृत माहिती सादर करून फुल शेतीसाठी मॅग्नेट प्रकल्प कसा महत्त्वाचा आहे. याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मा.श्री अनुपकुमार यांनी मॅग्नेट प्रकल्प हा देशातील एक यशस्वी प्रकल्प असल्याने एशियाई विकास बँके कडे देशातील आठ ते नऊ राज्यानी या प्रकल्पाची मागणी केल्याचे सांगितले. फुल शेतीमध्ये महाराष्ट्र राज्य हे एक अग्रेसर राज्य म्हणून पुढे आले असून नांदेड, धाराशिव इत्यादी जिल्ह्यामध्ये फुल शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे निदर्शनास आणले. राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था हे फुल शेतीचे माहेरघर आहे असे नमूद करून, तरुण फुल उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन स्टार्टअपच्या माध्यमातून या संधीचा फायदा घेतला पाहिजे असे सांगितले. फुल शेतीमध्ये मूल्य साखळी विकसित होण्याची आवश्यकता असून यामुळेच फुलांचा समावेश मॅग्नेट प्रकल्पात केल्याचे सांगितले. फुल शेतीसाठी मुदत कर्ज व खेळते भाग भांडवलासाठी मॅग्नेट प्रकल्पाच्या FIL घटकांतर्गत फलोत्पादन व फुलपिकांसाठी एकुण प्रकत्प कालावधीत रु.500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलेले असून याचा सुद्धा फायदा फुल उत्पादक शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन डॉ. अमोल यादव यांनी केले.
सदर कार्यशाळेमध्ये संरक्षित फुल शेती बाबत के.एफ बायोप्लांटचे श्री आशिष फडके, फुल शेती लागवड याबाबतचे आयसीएआर चे शास्त्रज्ञ डॉ. गणेश कदम यांनी व फुलांची काढणी व्यवस्थापन व निर्यात याबाबत पंडित शिकारे इत्यादी तज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.
सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री ईश्वर बांदल यांनी केले व उपस्थितीत फुलउत्पादकांचे श्री विश्वास जाधव यांनी आभार मानले. दुपारच्या सत्रामध्ये सर्व उपस्थित उत्पादक शेतकऱ्यांना सोएक्स फ्लोरा या फुलाची निर्यात करणाऱ्या कंपनीच्या प्रक्षेत्रास भेट देऊन त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या प्री कुलिंग,कोल्ड स्टोरेज ,पॅक हाऊस, फुलाची काढणी व विपणन या संदर्भात कंपनीचे संचालक श्री नरेंद्र पाटील व सरव्यवस्थापक श्री धनंजय कदम यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेस उपस्थित असलेल्या सर्व फुल उत्पादक शेतकऱ्यांना दिनांक 17 मे 2024 रोजी सकाळी 10.३० वाजता के.एफ बायोफ्लाट मांजरी येथे प्रक्षेत्र भेट देण्यात येणार असून, फुल उत्पादक शेतकऱ्यांना फुलशेतीची अभिवृद्धी, लागवड व त्याबाबत घ्यावयाची काळजी फुलांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान व विपणन याबाबत के एफ बायोप्लांट्स संचालक श्री किशोर राजहंस व राजन निफाडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. मॅग्नेट प्रकल्प अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी मूल्य साखळी विकसित करण्यासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्याबाबत मॅग्नेट प्रकल्पाचे संचालक श्री विनायक कोकरे यांनी आवाहन केले आहे.