बळवंतराव यादव विद्यालयातील विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चितपणे उज्ज्वल होणार -प्रवीणकुमार फाटक

    बळवंतराव यादव विद्यालयातील विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चितपणे उज्ज्वल होणार -प्रवीणकुमार फाटक

     

     

    पेठवडगाव,(प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून ज्ञान देण्याचे काम बळवंतराव यादव विद्यालयामार्फत सुरू आहे,तसेच पाठ्यपुस्तकातील ज्ञानाचा,जीवनात कसा उपयोग करायचा याचे प्रात्यक्षिक शाळेने विज्ञान प्रदर्शनातून करून दिले आहे. त्यामुळेच शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चितपणे उज्ज्वल होणार आहे. असे प्रतिपादन माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक प्रवीणकुमार फाटक यांनी व्यक्त केले. ते पेठवडगाव येथील बळवंतराव यादव विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शनअंतर्गत अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

    यावेळी संस्थेचे कार्यवाह अभिजीत गायकवाड, मुख्याध्यापक अविनाश पाटील, उपमुख्याध्यापिका मनीषा पोळ, पर्यवेक्षक मनोज शिंगे, संताजी भोसले,पी.बी.पाटील, विज्ञान विभाग प्रमुख सौ.व्ही.पी.पवार प्रमुख उपस्थितीत होते. विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात विज्ञान गीताने करण्यात आली.दीपप्रज्वलन व रोपटयास जलार्पण करण्यात आले. प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका मनीषा पोळ यांनी केले.यावेळी मुख्याध्यापक अविनाश पाटील, विद्यार्थीनी स्वराली लाटवडे यांचे मनोगत झाले. प्रदर्शनात लहान गटात शंभर उपकरणे व मोठ्या गटात ४६ उपकरणे मांडण्यात आली होती. आभार सौ.पी. एस. बसागरे यांनी मानले. सुत्रसंचालन स्वास्तिक माळी यांनी केले.यावेळी विज्ञान विभागाचे संदीप नायकवडी, अमोल कुंभार,सौ.एस.आर.चव्हाण, सौ.एस.ए‌.पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजन केले.