वारणा नदी काठावरील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे शासनाने त्वरित करण्याची मागणी
कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):- हातकणंगले तालुक्यातील कुंभोज सह भागातील शेकडो एकर क्षेत्रातील आगाप पिकांचे परतीच्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अजून देखील पाऊस सुरूच आहे. परिणामी पीक नुकसानीची तीव्रता वाढणार आहे. याची दखल घेऊन शासनाने तातडीने हानी झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे. याआधी जुलैमध्ये शेतातील ऊसासह अन्य पिके वारणा नदीच्या पुराच्या पाण्यात बुडाली होती. त्यावेळी देखील काहीशा विलंबाने नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. आता पावसाने झालेल्या हानीचे संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी हानीग्रस्त शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.
वारणा नदीच्या आलेल्या पुरात येथे नदीकाठची पिके बुडाली होती. यामुळे सोयाबीन, भुईमूग, ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता हीच पिके काढणीस आली आहेत आणि याचवेळी पाऊस सुरू झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या हानीस सामोरे जावे लागत आहे. वारणा नदीच्या महापुराचा नदीकाठच्या पिकांना सातत्याने फटका बसला आहे. या भागात नदीकाठच्या जवळपास हाजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस पिकाला आपल्या कवेत घेतले होते, तर आगाप सोयाबीन,आणि भाजीपाला पिकांना पुराच्या पाण्याचा सामना करावा लागला होता.
परिणामी परतीच्या पावसाने परिसरात दमदार हजेरी लावल्याने ऊस सोयाबीन भुईमूग व अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच राहण्यातील अद्यापही पाणी साठवून राहिल्याने ऊस तोडी बऱ्याचशाच पुढे ढकलण्यात आले आहेत पण मी रानात पाणी साठवून राहिल्याने ऊस पिकाची मोठी नुकसान झाली आहे शेतकऱ्यांनी केलेल्या लावणी सध्या वैरनीसाठी विकल्या जात आहेत. परिणामी हातकणंगले तालुका कृषी विभागाने कुंभोज सह वारणा नदीकाठातील सर्वच गावाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या पिकाचे पंचनामे करावेत अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्गातून होत आहे.