जिल्ह्याच्या राजकारणात 13 साखर कारखानदार आमदारकीच्या निवडणुक रिंगणात…
कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कोल्हापूर जिल्ह्यातील 13 कारखानदार विधानसभेच्या रिंगणात उतरणार : जिल्ह्यात जवळपास 13 साखर कारखान्यांचे चेअरमन अथवा संचालक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने गळीत हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांपैकी तब्बल 13 साखर कारखानदार निवडणुकीचा मैदानात उतरण्यासाठी तयारी करत आहेत. परिणामी साखर कारखानदारांना सध्या आमदारकीची डोहाळे लागले असल्याचे चित्र दिसत असून याची चर्चा मात्र जिल्ह्यात सर्व रंगत आहे परिणामी सहकारात विना सहकार नही उद्धार या म्हणीचा खऱ्या अर्थाने साखर कारखानदार योग्य वापर करत असून कारखान्याबरोबरच विधानसभा महत्त्वाची असल्याचे चित्र त्यांनी जनतेसमोर उभा केले आहे.जिल्ह्याची राजकारण हे सर्वच साखर कारखानदारांच्या भोवती फिरत असल्याचे चित्र दिसत असून साखर कारखान्याबरोबर राज्याचे राजकारण करणाऱ्या सर्वच इच्छुक व भावी उमेदवारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव कधी होणार असाही प्रश्न सर्वसामान्य शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.परिणामी आता साखर कारखान्याची चेअरमनच विधानसभा निवडणुकीत गुंतत असल्याने यावर्षीचा गळीत हंगाम लाबणार का थांबणार असा प्रश्न निर्माण झाला असून उसाला नक्की भाव मिळणार का असा सवाल ही निर्माण होत आहे. परिणामी अनेक कारखान्याच्या कर्मचारी व सभासदांची यंत्रणा आपापल्या कारखान्याच्या चेअरमनला निवडून आणण्यासाठी गतिशील झाली असून आपले चेअरमन हे आमदारकीला कसे योग्य आहेत हे सांगण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे परिणामी त्यांच्याबरोबरच कारखान्याचे सर्व संचालक बॉडी सध्या मैदानात उतरली असून प्रत्येक संचालक वेगवेगळ्या पद्धतीने आपली प्रचाराची भूमिका बजावत आहे.
कागल विधानसभेत कोण असणार संताजी घोरपडे कारखान्याचे सर्वेसर्वा हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे तुतारी फुंकणार आहेत. तर या दोघांच्याविरोधात बंडखोरीचे अस्त्र बाहेर काढत सदाशिवराव मंडलिक कारखान्याचे संचालक विरेंद्र मंडलिक यांनीही मैदानात उतरण्याचे ठरवले आहे.
इचलकरंजी, हातकणंगले विधानसभा इचलकरंजी मतदार संघातून इच्छुक असलेले नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहुल आवाडे हे मैदानात असणार आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांचे पूत्र राहुल आवाडे हे पहिल्यांदाच रिंगणात उतरणार आहेत.
शिरोळ विधानसभा शिरोळ विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार शरद साखर सहकारी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर मैदानात उतरणार आहेत. तर यांच्याविरोधात दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील आणि गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
करवीर तालुक्यातून हे कारखानदार करवीर विधानसभा मतदार संघातून दिवंगत आमदार भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी. एन. पाटील यांचा मुलगा राहुल पाटील रिंगणात असणार आहेत. तर यांच्या विरोधात कुंभी साखर कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रदीप नरके मैदानात असणार आहेत.
दरम्यान जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या करवीर तालुक्यातील दक्षिण मतदार संघातून डी. वाय. पाटील कारखान्याचे चेअरमन आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील हे मैदानात उतरणार आहेत. तर यांचे प्रतिस्पर्धी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार अमल महाडिक हे रिंगणात असणार आहेत. या विधानसभा मतदार आतापासूनच जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे.
राधानगरी विधानसभा जिल्ह्यातील सर्वात उच्चांकी दर देणाऱ्या बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील राधानगरी भुदरगड तालुक्यातून जोरदार तयारी करताना दिसत आहेत. तर बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष राहिलेले ए. वाय. पाटीलही येथूनच तयारी करताना दिसत आहेत.
पन्हाळा विधानसभा महायुतीचे घटकपक्ष असलेल्या वारणा साखर कारखान्याचे चेअरमन जनसुराज्य शक्तीचे अध्यक्ष विनय कोरे यांनी पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातून तयारी सुरू केली आहे. तर विश्वास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजीत पाटील हेही यांच्याविरोधात रिंगणात असणार आहेत.
गाळप हंगामाला गती मिळणार का?
यंदा साखर कारखान्यांना 15 नोव्हेंबरनंतर गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली. परंतु विधानसभा निवडणुकांमुळे गळीत हंगामाला थोडासा ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. अशातच साखर आयुक्तांनी साखर हंगाम वेळेआदी सुरू केल्यास कारवाई करणार असल्याचे आदेश काढल्याने कारखानदार हे धाडस करणार नाहीत. दरम्यान हंगाम लांबल्यास पूरबाधित पिकांचे नुकसान होणार आहे परंतु चांगल्या उसाच्या वजनात वाढ होणार आहे.