माझी वसुंधरा अभियानात वडगाव पालिकेस पन्नास लाखांचे बक्षीस , विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक
पेठ वडगाव / प्रतिनिधी : वडगाव नगरपरिषद माझी वसुंधरा अभियानात विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करत ५० लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त केले. या यशाबद्दल पालिका प्रशासनाचे कौतुक होत आहे.
माझी वसुंधरा अभियान ४.० या स्पर्धेमध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व २२ हजार २९८ ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. यामध्ये २५ ते ५० हजार लोकसंख्या गटात आपल्या वडगाव नगर परिषदेने पुणे विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करत ५० लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त केले.
नगरपरिषदेने यापूर्वीही स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेमध्ये ओडीएफ प्लस प्लस, कचरा मुक्त शहराच्या मानांकनात थ्री स्टार व स्वच्छ सर्वेक्षण मध्ये अव्वल कामगिरी देखील केलेली आहे. यावर्षी वडगाव पालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी शहरातील सर्व नागरिकांना सहभागी करून वृक्षारोपण, वायु प्रदूषण जनजागृती उपक्रम,जनजागृती स्पर्धा, हरित शपथ,पंचतत्व दर्शविणाऱ्या कलाकृती असे विविध उपक्रमांचे आयोजन केले.या उपक्रमांना वडगाव शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वडगाव शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, पत्रकार, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी,शहरातील सुज्ञ नागरिक या सर्वांच्या सहकार्याने हे यश आपण संपन्न करू शकलो असे मत नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी व्यक्त केले.
प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. सुमित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी महादेव सरांबळे, माझी वसुंधरा अभियान नोडल ऑफिसर सुप्रिया गोडेकर, स्वच्छता निरीक्षक विशाल धनवडे, शहर समन्वयक शिवम माने, माहिती शिक्षण संवाद सल्लागार शिवराज जाधव, ब्रँड अँबेसिडर संतोष सणगर व नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यातून हे यश प्राप्त झाले.
आगामी माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये वडगाव नगरपरिषदेला अव्वल स्थान प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी असेच योगदान द्यावे व सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी केले आहे.