कृषी उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा- आमदार ऋतुराज पाटील 

    कृषी उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा- आमदार ऋतुराज पाटील

    -डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्यावतीने येवती येथे शेतकरी मेळावा

     

    नवे पारगाव :- विविध पिकांच्या उत्पादन वाढवण्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधन सुरू आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होउन शेती किफायतशीर होईल असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्यावतीने येवती (ता करवीर) येथे आयोजित भव्य शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन कार्यक्रमात आमदार पाटील बोलत होते.

     

    आमदार पाटील म्हणाले, शेतीकडे व्यवसाय म्हणून बघणे गरजेचे आहे. त्यासाठी नवीन संशोधनाचा शेतीमध्ये अवलंब करणे आवश्यक आहे . त्याचबरोबर जोडधंदा व शेतीचे उत्तम व्यवस्थापन याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. डी वाय पाटील ग्रुपच्या माध्यमातून शेती व शेतीचे तंत्रज्ञान याचा सातत्याने प्रसार केला जात आहे. कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील बारा गावांमध्ये आम्ही कृषी व्यवसाय मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही केले आहे.

     

    ऊसतज्ञ डॉ. अंकुश चोरमुले म्हणाले, उसाच्या एकरी उतारा वाढवण्यासाठी उसाच्या पाचटाचे सुयोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. उसाचे पाचट हे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे काम करते आणि सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे. उसावरील मुख्य कीड हुमणीचा प्रादुर्भाव जर जास्त होत असेल तर त्यासाठी रासायनिक पद्धतीचा अवलंब न करता जैविक व सेंद्रिय पद्धतीने त्याचे व्यवस्थापन करावे.

     

    गोकुळचे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी डॉ. एम. पी. पाटील यांनी “दुग्धोत्पादन तंत्रज्ञान” या विषयावर बोलताना म्हणाले यशस्वी दुग्धव्यवसायासाठी जनावरांची जात, त्यांचे खाद्य आणि व्यवस्थापन ही अत्यंत महत्वाची त्रिसूत्रे आहेत. जनावरांच्या कोणत्या जाती निवडाव्यात तसेच त्यांना कोणत्या प्रकारचे खाद्य व ते किती प्रमाणात द्यावे आणि त्याचा दूध उत्पादनांवर होणारा परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले. जनावरांच्या योग्य

    व्यवस्थापनासाठी मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा असा शेतकऱ्यांना सल्ला दिला.

     

    कृषी प्रदर्शनामध्ये विविध नामांकित कंपन्यांचे खते, बियाणे, कीटकनाशके, कृषी अवजारे स्टॉल तसेच महिला बचत गट व विद्यार्थ्यांचे स्टॉल लावले होते

     

    मेळाव्यास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील (चुयेकर ), बिद्री कारखान्याचे संचालक एस. बी. पाटील, आर. एस. कांबळे यांच्यासह प्रा. आर. आर. पाटील, डॉ. एस. एम. घोलपे, वाय. व्ही. पाटील, प्रा. एम. एन. केंगरे, संपत दळवी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींसह पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.