कुंभोज परिसरात गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग
कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश मूर्तीकारांच्या हाताला वेग येऊ लागला आहे. ग्रामीण भागात गणेशमूर्ती तयार करण्याची लगबग दिसत आहे.सार्वजनिक गणेशमूर्ती बरोबर घरगुती गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मूर्तीकार दंग झाले आहेत.
ग्रामीण भागात दरवर्षी मूर्तीकारांच्या कडून हजारो मूर्ती तयार होतात. हातकणंगले तालुक्यात सार्वजनिक मंडळांची संख्या जादा आहे.शिवाय अलिकडे विभक्त कुटुंबपद्धती वाढल्याने घरगुती गणेशमूर्तीच्या संख्येत वाढ झाली आहे.अगदी एक फुटापासुन ते दहा फुटांपर्यंत शाडूच्या मातीच्या किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविल्या जातात त्यामुळे गणेशमूर्ती बुकींगसाठी नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे.वेगवेगळ्या आकाराच्या आणि रूपात मूर्ती साकारू लागल्या आहेत.त्यामुळे कुंभारवाडे बहरू लागले आहेत.तालुक्यात कुंभार समाज भरपूर प्रमाणात आहे विशेषतः कुंभोज आळते पेटवडगाव भागात गणेशमूर्ती बनविल्या जातात.अलिकडच्या काळात ग्रामीण भागात बाहेरून विक्रीस येणार्या गणेशमूर्तीची संख्या वाढली आहे .त्यामुळे स्थानिक मूर्तीकारांना त्याचा फटका बसु लागला आहे.काही गावात मूर्तीकार आपली कला टिकवून आहेत परंतु इतर ठिकाणांहून मूर्ती मोठ्या प्रमाणात येत असल्याने स्थानिक मूर्तीकारांच्या कलेला धोका निर्माण झाला आहे.
आजही ग्रामीण भागात बलुतेदार पद्धत आहे,बलुत्यावर गणेशमूर्ती घेणार्यांची संख्या लक्षणीय आहे.पाच ते सात पायली धान्य देऊन मूर्ती खरेदी केली जाते.सध्या पाऊसाने उघडीप दिल्याने खरीपाची पिके वाळू लागली आहेत.चालुवर्षी महापुराचा फटका बसल्याने नदीकाठची पिके वाया गेली आहेत त्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण होणार आहे,त्याचा परिणाम गणेशमूर्ती विक्रीकर होणार आहे.शाडू मातीच्या मूर्ती पाठोपाठ प्लॕस्टरच्या मूर्ती बनविण्यासाठी आधुनिक रंग व उपकरणांचा वापर करावा लागतो,मातीची उपलब्धता, रंगाचे वाढते दर,कामगारांची कमतरता, विजेचा अनियमितता आदी समस्यांना मूर्तीकारांना तोंड द्यावे लागत आहे.
शेवटच्या टप्प्यात रंग आणि कोरीव कामासाठी लगबग सुरू आहे.शाडूच्या मूर्ती तयार करण्यासाठी अधिक वेळ लागतो तरीही बनविल्या जातात परंतु ग्राहकांचा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्याकडे कल असल्याने प्रदुषणात वाढ होऊ लागली आहे.यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज आहे,प्लास्टर ऑफ पॅरीसमुळे नदी,तलाव, विहिरी यांचे पाणी दुषीत होत आहे, यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. परिणामी ग्रामपंचायत कुंभोज व हातकणले पोलीस स्टेशन यांच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान कुंभोज सह परिसरातील सर्व तरुणांना करण्यात आले आहे.