वयाने कितीही मोठे व्हा, पण मनानं नेहमी युवा राहा – डॉ.अशोकराव माने

    वयाने कितीही मोठे व्हा, पण मनानं नेहमी युवा राहा – डॉ. अशोकराव माने

     

     

    हातकणंगले, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-आंतरराष्ट्रीय युवा दिन दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.हा दिवस तरुणांचा आवाज,कृती आणि प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांच्या विकासाच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. युवक हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. युवकांना नागरिकांचे अधिकार,सामाजिक न्याय आणि विश्वशांतीच्या महत्त्वाबाबत जागरूक केले तर जगात विविध पातळ्यांवर असणारे संघर्ष, वाद कमी होऊ शकतील. अशा अनुकुल बदलासाठी युवावर्ग निश्चितपणे पुढे येईल. जनसामान्यांच्या प्रगतीसाठी जागतिक शांततेचे महत्त्व लक्षात घेता शांतता प्रस्थापित करण्यात युवकांची भूमिका महत्त्वाचे ठरणार आहे.आजचा युवक ज्ञान आणि विज्ञानाच्या विश्वात वावरणारा आहे.मानवी मुल्ये आणि मानवी विकासाबाबत त्याला चांगली जाण आहे. विज्ञान – तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता त्याच्यात आहे. या क्षमतेचा उपयोग तो जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी निश्चितपणे करू शकतो.जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने या भूमिकेबाबत चर्चा होणे आणि त्या दिशेने युवकांचा सहभाग वाढणे तेवढेच महत्त्वाचे आहे. यापुढील काळात आपल्या मतदारसंघातील युवकांना दर्जेदार व्यासपीठावर एकत्र आणण्याचा प्रयत्न आपण करूयात,असे दलितमित्र अशोकराव माने बापू यांनी आज एका कार्यक्रमात व्यक्त केले.

     

    बापूंचे युवकांसाठीचे कार्य

    युवकांच्या प्रश्नांची जाण असणारे आणि युवकांसाठी निरंतर काम करणारे दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांना १९८८ साली राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित कऱण्यात आले होते. दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या हस्ते दिल्ली येथे हा पुरस्कार आदरणीय अशोकबापूंना देण्यात आला होता. १९८९ साली आशियाई युवक महोत्सवात भाग घेण्याची संधी त्यांना मिळाली होती. तसेच १९९१-९२ साली मॉरिशस येथे पार पडलेल्या जागतिक युवक महोत्सवातही अशोकबापूंनी सहभाग घेतला होता.