कृष्णा अँटीऑक्सीडंट तर्फे साडेतेरा लक्ष खर्चून’शाळा सुधार
* खडपोली येथील जिल्हा परिषदेची शाळा
* उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तर
* शिक्षक, ग्रामस्थातून कृतज्ञता सोहळा
चिपळूण,दि.19 (वार्ताहर /प्रतिनिधी):-ग्रामीण भागातील शाळा या पायाभूत सेवा सुविधांनी युक्त असाव्यात यासाठी कृष्णा अँटीऑक्सीडंट प्रा. लि. या कंपनीतर्फे दिशान्तर संस्थेच्या सहयोगातून चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक येथे शाळा सुधार उपक्रमांतर्गत 13 लाख 39 हजार रुपयांचे काम करून देण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे मात्र विपरीत परिस्थितीमुळे तसेच शिक्षणासंदर्भाने येणाऱ्या अडचणी या त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत अडथळा ठरतात. याचमुळे जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या दरवर्षी कमालीच्या संख्येने घटते. तर काही शाळा विद्यार्थी अभावी बंद पडतात. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधून पायाभूत सेवा सुविधांचे निर्माण कार्य व्हायला हवे. या जोडीने शहरातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी आधुनिक शिक्षण पद्धतीचा देखील अवलंब व्हायला हवा. याच हेतूने कृष्णा अँटीऑक्सीडंट प्रा.लि. या कंपनी च्या सामाजिक उत्तरदायित्वातून खडपोली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ चे काम हाती घेण्यात आले.
गळक्या इमारतींमुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणे दुरापास्त झाले होते.
कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्वातून कोणते काम हाती घ्यावे या दृष्टिकोनातून कंपनी अधिकारी व दिशान्तर संस्था यांनी संयुक्त पाहणी केली. उन्हाळी सुट्टीच्या काळात स्टॅंडिंग स्ट्रक्चर्स टेरेस शेड, पॅरापिट वॉल, जिना प्लास्टर व रंगकाम हे काम करण्यात आले. यामुळे पाझरणारी इमारत संरक्षित झाली. त्यात अध्ययन- अध्यापनाचे काम सुरू झाले.
एवढेच नव्हे तर ही टेरेस शेड अशा पद्धतीने बांधण्यात आली की त्याचे या प्रशालेसाठी एक मोठ्या सभागृहात रूपांतर झाले. याशिवाय अन्य तीन इमारतींना टेरेस शेड बांधण्यात आली.
या सर्व कामाचे लोकार्पण कृष्णा अंँटीऑक्सीडंट प्रा. लि. या कंपनीचे कार्यकारी संचालक
टी. रहमान तसेच कंपनीचे उपाध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून झाले. यावेळी कंपनीचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक सुयोग चव्हाण, दिशान्तर संस्थेचे अध्यक्ष राजेश जोष्टे, सचिव सीमा यादव, सरपंच सारिका भुवड, सुभाषराव शिंदे, विलास बापट, निलेश कदम, दत्ता रांगावकर, शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण शिवतरकर यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या या शाळेची स्थिती आणि त्याचा अध्ययनावर होणारा परिणाम हे विशद करून कंपनीच्या सामाजिक उत्तरदायातून झालेल्या या कामामुळे ग्रामस्थ विद्यार्थी व शिक्षक आनंदून गेल्याचे व त्याचा मोठा परिणाम सकारात्मक परिणाम येथील अध्ययन अध्यापनावर होणार असल्याचे सांगण्यात आले.
देशात सर्वाधिक भारतरत्न हे कोकणातील आहेत. त्याच जोडीने अनेक महान विभूती या मातीमध्ये जन्माला आल्या की, ज्यांनी राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला नावलौकिक मिळवला. विशेष म्हणजे ही सारी व्यक्तीत्व ग्रामीण भागात जन्माला आली. त्यामुळे आपण गावात शिकतो किंवा खाजगी शाळेत शिकायला जात नाही याचा कमीपणा न बाळगता दुर्दम्य ध्येयनिष्ठेनं वाटचाल सुरू ठेवायला हवी असे दिशान्तरचे असे राजेश जोष्टे यांनी सांगितले. दिशान्तर संस्थेने ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानयज्ञ सुरू ठेवला आहे. यातून दप्तरासह शैक्षणिक साहित्य, विज्ञान किट, संगणक, शेकडो सायकली असे शैक्षणिक व शिक्षण पूरक साहित्य दरवर्षी देऊ केले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी क्रमिक अभ्यासक्रमाची पुस्तक पेढी च्या माध्यमातून २६ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ दिला आहे. तर उच्च शिक्षणासाठी ३५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देऊ केली आहे. प्रसाधन गृहासाठी वॉश प्रकल्प तर आधुनिक शिक्षण पद्धतीसाठी डिजिटल क्लासरूम ची निर्मिती इतर काही शाळांमधून करण्यात आली असल्याचे श्री. जोष्टे यांनी सांगितले.
खडपोली येथील या प्रशालेच्या कामकाजाच्या वेळी ग्राम शिक्षण समिती, शिक्षक- पालक संघ, ग्रामपंचायत तसेच सर्व ग्रामस्थांनी केलेल्या सकारात्मक सहकार्यामुळे हे काम वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात आल्याबद्दल कंपनीचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक श्री. सुयोग चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.
ग्रामीण भागातील विद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा व आधुनिक शिक्षण पद्धती याचा अंतर्भाव झाला तर पटसंख्खेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि अशाच चांगल्या शाळेतून उत्तम सनदी अधिकारी व राष्ट्रसेवक निर्माण होतील असा आशावाद कंपनीचे उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी व्यक्त केला. शाळा, ग्रंथालय हे ज्ञानपीठ आहेत. गावागावातून समृद्ध ग्रंथालय उभी राहायला हवीत तर मन मेंदू आणि मनगट सशक्त होईल. जिल्हा परिषद शाळेसाठी आमच्या कंपनीतर्फे येथे झालेल्या या चांगल्या कामाचे समाधान विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांच्याही चेहऱ्यावर दिसत असल्याने त्या कामाचा मला आनंद नि अभिमान वाटतो असे प्रतिपादन कंपनीचे कार्यकारी संचालक टी. रहमान यांनी केले.
खडपोली येथील ज्येष्ठ नागरिक व शिक्षण प्रेमी अप्पासाहेब शिंदे यांनी गत ४०वर्षापासून सुरू असलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमाचा आढावा घेतला. तर मुख्याध्यापक शिवतरकर यांनी येथील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. या सुविधेमुळे ते अधिक एकाग्रतेने अभ्यास करतील तसेच दुसऱ्या टप्प्यात देखील कंपनीतर्फे काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थ्यांना सर्वतोपरी चांगले शिक्षण मिळावे या हेतूने कृष्णा अँटीऑक्सीडंट कंपनीच्या शैक्षणिक योगदानाबद्दल कामाबद्दल अध्यक्षांनी कृतज्ञता व्यक्त केली. एका शासकीय जिल्हा परिषद शाळेच्या प्रगती करिता आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नती करता तब्बल साडे तेरा लक्ष रुपयांचे योगदान कृष्णा एंटीऑक्सीडंट या कंपनीतर्फे देण्यात आले. याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अनिल तांबट, शिक्षक पालक संघाचे विजय जोशी, खेर्डी केंद्रप्रमुख वृषाली भुरण तसेच सर्व ग्रामस्थांनी अतिव समाधान व्यक्त केले.