विद्या मंदिर मौजे वडगावचे हिरव्या गावाच्या स्वप्नपूर्तीसाठी कृतीशील पाऊल

    विद्या मंदिर मौजे वडगावचे हिरव्या गावाच्या स्वप्नपूर्तीसाठी कृतीशील पाऊल

     

     

     

    शिरोली पुलाची ,(प्रकाश कांबरे):- मौजे वडगांव येथील विद्या मंदिर मौजे वडगाव या प्रशालेने विद्यार्थ्यांच्या मदतीने हिरव्या मौजे वडगावच्या स्वप्नपूर्तीसाठी ‘लावेल त्याला मागेल ते झाड ‘ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून एक कृतिशील पाऊल टाकले आहे.

    शाळेतील इको क्लबच्या माध्यमातून निवडक २७ विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने जागा उपलब्ध असेल तेथे (अंगणात / शेतात) झाडांसाठी प्रथम खड्डे काढले. त्यानंतर ज्याला जे झाड हवे ते पुरवण्यात आले. विद्यार्थ्यांनी आंबा, पेरू, चिंच, चिकू, कढीपत्ता, सीताफळ, आवळा अशा प्रकारची 57 झाडे शाळे कडून मागून घेतली.आपली प्राचीन ओळख वडाचे गाव म्हणजे मौजे वडगाव याची आठवण करून तीन विद्यार्थ्यांनी वडाची झाडे जाणीवपूर्वक मागून घेतली.

    आता ही सर्व झाडे विद्यार्थ्यांनी पालकांच्या साह्याने लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी देखील घेतली आहे.

    या उपक्रमात त विद्यार्थ्यांना पालकांचेही मोलाचे सहकार्य मिळाल्याने हिरव्या मौजे वडगाव चे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. या पर्यावरण पूरक उपक्रमाबद्दल पालकातून शाळेचे कौतुक होत आहे.

    शाळेचे मुख्याध्यापक बाळासो कोठावळे सर यांच्या प्रेरणेने इको क्लबचे मार्गदर्शक देवदत्त कुंभार यांनी लावेल त्याला मागेल ते झाडया उपक्रमाचे आयोजन केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. सायली चव्हाण, फिरोज मुल्ला, रिजवाना नदाफ, सविता कांबळे, वैशाली कांबळे, शबाना जमादार, स्वाती देसाई, वैशाली कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले.