6 जुलै 2024 चा शैक्षणिक व्यासपीठाचा मोर्चा स्थगित
कोल्हापूर / (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 15 मार्च 2024 रोजी घेतलेला संचमान्यतेचा निर्णय चुकीचा व शिक्षण क्षेत्रावर अन्याय करणारा आहे . हा आदेश संपूर्ण शिक्षण क्षेत्रच उध्वस्त करणारा असल्याने त्या विरोधात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शनिवार दिनांक 6 जुलै 24 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, खाजगी व महापालिका प्राथमिक शिक्षक ,सेवक , मुख्याध्यापक, संस्थाचालक यांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु जिल्हा दंडाधिकारी यांनी दिनांक 14 जुलै 2024 पर्यंत मोर्चा व आंदोलनास बंदी आदेश जाहीर केल्यामुळे आपल्या मोर्चास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने काढण्यात येणारा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने हा आदेश रद्द केला नाही तर त्या विरोधात यथावकाश मोर्चा काढला जाईल.आपणास त्या बाबत योग्य वेळी निश्चित कळवले जाईल .आपण सर्वांनी मोर्चा संदर्भात जी सहकार्याची भूमिका घेतली होती त्याच पद्धतीने भविष्यात सहकार्य मिळावे ही अपेक्षा.अशी माहिती प्रसिध्दीस शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूरचे अध्यक्ष एस.डी.लाड व मुख्याध्यापक संघ कोल्हापूरचे चेअरमन राहुल पवार यांनी दिली.