निलेवाडी हद्दीतील वारणा नदीपात्रात आढळला वृद्ध महिलेचा मृतदेह

    निलेवाडी हद्दीतील वारणा नदीपात्रात आढळला वृद्ध महिलेचा मृतदेह

     

     

     

    नवे पारगाव: निलेवाडी,(ता.हातकणंगले) हद्दीतील वारणा नदीपात्रात रविवारी सायंकाळी एका वृध्देचा मृतदेह आढळुन आला. सदर वृध्देची तिच्या नातलगाना ओळख पटली असुन कोडोली,(ता.पन्हाळा) येथील पोलीस ठाणेस मिसींग नोंद असलेल्या हौसाबाई नामदेव राबाडे,(वय ८५, रा.कोडोली) असे यातील मृत वृध्देचे नांव आहे.घटनेची नोंद वडगांव पोलीस ठाणेत झाली आहे.

    याबाबत वडगाव पोलीसातून मिळालेली माहिती अशी,हौसाबाई राबाडे या आपले तीन मुले,सुना व नातवंडांसह कोडोली कोटेश्वर मंदीर परीसरात वास्तव्यास होत्या.शुक्रवार ता.२१ रोजी त्या कोडोलीतील आपल्या राहत्या घरातुन सायंकाळी ६ वा. दरम्यान घरी कोणासही कसलीही कल्पना न देता अंगावरील आपले गळ्यातील कानातील सुवर्ण फूले व बुगड्या, गळ्यातील गोल सुवर्ण मण्यांच्या माळेसह व दोन्ही हातातील सोन्याच्या पाटल्यांसह घराबाहेर पडल्या होत्या. तथापी शुक्रवारी घरच्यानी खुप शोधाशोध करूनही त्या मिळून न आल्याने शनिवारी ता.२२ रोजी कोडोली पोलीस ठाणेकडे मिसींग दाखल केले होते.दरम्यान रविवारी रात्री ८ वा दरम्यान निलेवाडी येथील अरविंद घाटगे यांच्या शेतजमिनी शेजारील वारणा नदीच्या पाणी पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आल्याचे समजताच वडगांव पोलीस ठाण्याचे पीएसआय गिरीश शिंदे, हवालदार रवि गायकवाड,महिला पो कॉ संध्या सासणे आदीनी पंचनामा करून नवे पारगावचे ग्रामीण रुग्नालयामध्ये डॉ अनिता शहा यानी रात्री उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला.पुढील तपास वडगांव पोलीस ठाण्याचे पीएसआय गिरीश शिंदे करत आहेत.