नवीन संच मान्यतेला विरोध करण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठाचा ६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
कोल्हापूर / (प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दि. १५ मार्च २०२४ रोजी निर्गमित केलेल्या शाळा संच मान्यता आदेशास तिव्र विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापुर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने शनिवार दि. ६ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय आज शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांनी आयोजित केलेल्या सभेत घेण्यात आला. ही सभा मुख्याध्यापक संघाच्या विद्या भवन येथील कार्यालयात शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
शाळा संच मान्यतेचा नूतन आदेश अत्यंत अन्यायकारक असून शिक्षण क्षेत्र उध्वस्त करणारा आहे, असे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांनी केले. ते म्हणाले, सदरच्या चुकीच्या आदेशामुळे असंख्य मुख्याध्यापक व शिक्षकांची पदे रद्द होणार आहेत. अनेक शाळांना विशेष शिक्षक मिळाणार नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होणार आहे. मुख्याध्यापक हे प्रशासकिय पद असल्याने शाळा तिथे मुख्याध्यापक हे पद असलेच पाहिजे. अन्यथा शाळेचे संपूर्ण प्रशासन कोलमडून पडेल.
व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड व मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहूल पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर सेवक यांनी प्रचंड संख्येनी या मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्र शासनास हा आदेश रद्द करण्यास भाग पाडूया असे आवाहन केले.
या सभेत शिक्षक नेते दादासाहेब लाड, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, सुधाकर सावंत, सुरेश संकपाळ, भाग्यश्री राणे, व्ही. जी. पोवार, राजेंद्र सुर्यवंशी, बाबा पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
या सभेस प्रा. सी. एम. गायकवाड,सुधाकर निर्मळे,रवींद्र मोरे, श्रीकांत पाटील, सागर चुडाप्पा, एस. के. पाटील, विष्णू पाटील, काकासाहेब भोकरे,राजेंद्र कोरे, संतोष आयरे, उदय पाटील, प्रताप देशमुख,एम. जी. पाटील, दीपक पाटील आदीसह कोल्हापूर जिल्हयातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व व्यासपीठाचे सर्व सदस्य उपस्थित होते.स्वागत व प्रास्तावीक मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील यांनी केले. उपाध्यक्ष मिलींद पांगीरेकर यांनी आभार मानले.