घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन

     

    कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा विषय घेऊन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२१ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल. फोटो किंवा चित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण असल्यास अविराज मराठे- ७३८५७६९३२८ व प्रणव सलगरकर- ८६६९०५८३२५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून कळवावे.
    सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. घरोघरी छोटेखानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिला जातो. या स्पर्धेचा विषय ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा आहे. मताधिकार हा १८ वर्षांवरील नागिराकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवावयाच्या आहेत. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे,पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे,यांसारख्या विषयांवर आपल्या सजावटीतून जागृती करता येईल.
    स्पर्धेची नियमावली याप्रमाणे-
    १. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
    २. स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकाने पुढीलप्रमाणे साहित्य पाठवावे :
    २.१ सदर विषयाला अनुसरून केलेल्या सजावटीचे विविध कोनांतून काढलेले पाच फोटो पाठवावेत.
    २.२ फोटो मूळ स्वरूपातील असावेत, त्यावर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाईन, असे अधिकचे काही जोडू नये.
    २.३ प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त २०० KB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा. पाचही फोटोंची एकत्रित साइज १ mb पेक्षा जास्त असू नये.
    २.४ आपल्या सजावटीची ध्वनिचित्रफीत पाठवताना, ती कमीत-कमी ३० सेकंदांची आणि जास्तीत-जास्त एक मिनिटाची पाठवावी.
    २.५ चित्रफीत (व्हिडिओ) अपलोड करताना, मूळ रूपात आहे त्या स्वरूपात पाठवावी, कोणत्याही प्रकारे संपादित (एडिटिंग) करू नये. चित्रिकरण करताना देखाव्याचे वर्णन करतानाचा आवाज मुद्रित (रेकॉर्ड) केल्यास चालेल.
    २.६ ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त १०० mb असावी. तसेच, ही ध्वनिचित्रफित mp4 फॉरमॅटमध्ये असावी.
    ३ स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या विषयावर पाच फोटो आणि चित्रफीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.
    ४. आपले फोटो आणि चित्रफीत https://forms.gle/6TxQHaKSAhZmBbQFA या गूगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत.
    ५.ज्या स्पर्धकांना फोटो किंवा चित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण येईल, त्यांनी
    अविराज मराठे – ७३८५७६९३२८, श्री. प्रणव सलगरकर – ८६६९०५८३२५, या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून कळवावे.
    ६. दिनांक १० सप्टेंबर २०२१ ते १९ सप्टेंबर २०२१ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.
    ७. बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे- प्रथम क्रमांक :-२१ हजार रू., द्वितीय क्रमांक:- ११ हजार रू., तृतीय क्रमांक :- ५ हजार रू. व उत्तेजनार्थ :- 1 हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे.
    ८. सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र देण्यात येईल.
    ९. आलेल्या सजावटींमधून सर्वोत्तम सजावटी निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील.
    १०. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी स्पर्धकाची असेल.
    ११. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.
    या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, तसेच मतदार नाव नोंदणी आणि वगळणी यांसाठी प्रसार-प्रचार केला जाणार आहे. गणेश मंडळाच्या मंडपात आणि ऑनलाइन माध्यमांद्वारेही ही जागृती केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅ़ड. नरेश दहिबावकर यांनी अधिकाधिक नागरिकांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दि. १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या पुनरीक्षणांचा कार्यक्रम १ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होत आहे. यामध्ये १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांच्या नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जातील, असेही त्यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.